पूजापत्री 

पीतांबर लोहार
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

लाडक्‍या गणरायाचे आपण आज भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हर्षोल्हासित वातावरणात स्वागत केले. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. काहींनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. काहींची तयारी सुरू आहे. त्यासाठी अनेकांनी पूजा साहित्याची खरेदी केलेली आहे. गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव झालेली आहे.

लाडक्‍या गणरायाचे आपण आज भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हर्षोल्हासित वातावरणात स्वागत केले. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. काहींनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. काहींची तयारी सुरू आहे. त्यासाठी अनेकांनी पूजा साहित्याची खरेदी केलेली आहे. गणपतीच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव झालेली आहे.

पूजासाहित्यातील एक भाग म्हणजे पत्री अर्थात वेगवेगळ्या झाडांची पाने आणि फुले. गणेशपूजनासाठी काही वनस्पतींची पाने आणि फुलांचा वापर केला जातो. ती पाने-फुले आणि त्यांचे महत्त्व सांगितले जाते. असे असले तरी, आपण निसर्गाकडे डोळसपणे पाहिल्यास आपल्याला निसर्गातील बदल लक्षात येतो. कारण, गणेशोत्सव आपण भाद्रपद महिन्यात साजरा करतो. या महिन्याचा विचार केल्यास, असे लक्षात येते, की भाद्रपद महिना सुरू होतो, तेव्हा पावसाळ्याच्या उत्तरार्धाचा शेवट सुरू असतो. सगळीकडे हिरवे-हिरवेगार वातावरण झालेले असते. अनेक प्रकारच्या वेलींनी, वनस्पतींनी सृष्टी नटलेली असते. वातावरण उल्हासित झालेले असते. सकाळ-संध्याकाळी कोवळी उन्हे मन प्रफुल्लित करतात. वेगवेगळ्या वनस्पतींची फुले-पाने आपल्याला आकर्षित करतात. जणू सांगत असतात की, 'हो आमचे अस्तित्वच जणू श्रीगणपतीच्या सेवेसाठी आहे. गणपतीच्या पूजनासाठीच आम्ही आहोत.' अशी अनेक पाने-फुले गणेशोत्सव काळात अर्थात भाद्रपद महिन्यात उपलब्ध असतात. अशा वनस्पतींचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये आढळतो. ब्रह्मणस्पती सूक्त, अथर्वशीर्ष, गणेश सहस्रनाम, गणेशपूजा अशा वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची नावे आढळतात. त्यातून पाना-फुलांची माहिती आपल्याला होते. हाच उद्देश कदाचित गणेशोत्सवाचा, भाद्रपद महिन्याचा, या सृष्टीचा असावा. गणपतीचे नामस्मरण करून पाने-फुले त्याला वाहिली जातात. त्यांचे औषधी गुणधर्म बघितल्यास ही पाने-फुले किती उपयोगी व बहुमोल आहेत, याची आपल्याला प्रचिती येते. 

मधुमालती : मधुमालती या वनस्पतीला वासंती, माधवी, चंद्रावळी अशा विविध नावांनी ओळखले जाते. खरूजवर ती गुणकारी औषधी वनस्पती आहे. 

माका : माका ही वनस्पती सहजासहजी उपलब्ध होते. तिला भृंगराज किंवा भांगरी असेही म्हणतात. श्राद्धपक्षातही तिला मानाचे पूजास्थान आहे. केसांची वाढ होणे, कफ कमी होणे यासाठी, माक्‍याच्या पानांचा रस उपयुक्त ठरतो. 

बेल : बेल म्हणजे बिल्वपत्र. शंकरजींच्या पिंडीवर बेलपत्र वाहिली जातात. बिल्वपत्र शंकरजींना प्रिय आहेत, असे म्हटले जाते. सर्वसाधारणपणे बेलाची तीन पाने एकत्र असतात. अनेकदा पाच पानेही असतात. त्यातील एक पान ब्रह्मदेवाचे, एक विष्णूचे आणि मधले शंकर-पार्वतीचे प्रतीक मानले जाते. औषधी गुणधर्मांचा विचार केल्यास कावीळ आणि मूळव्याधीवर बेलांच्या पानाचा रस उपयुक्त ठरतो. 

दूर्वा : हरळी, ग्रंथी, मंगला, शतमूला या नावानेही दूर्वा ओळखल्या जातात. तिची मुळे कधीही मरत नाहीत. ही तृण वनस्पती असून गवताचा प्रकार आहे. तिची पाने सुकली, तरी मुळे जिवंत राहतात. त्यामुळे तिला चिरंजीव वनस्पती असे म्हणतात. नाकातून रक्त येणे, शरीरावर डाग पडणे अशा व्याधींवर दूर्वांचा रस गुणकारी ठरतो. 

बोर : बोराच्या झाडाला लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्याची एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, 'एकदा भगवान विष्णू हिमालयात तप करीत होते. त्यांच्या अंगावर सावली राहावी म्हणून लक्ष्मीने गणपतीच्या कृपेने बदरीचे रूप धारण केले. तिलाच बोरही म्हणतात. गणपतीच्या पूजनात बोरांच्या पानांना विशेष स्थान आहे. बोरांच्या पानांचा लेप, साल आणि मुळांचा रस हा डोळ्यांच्या विकारावर गुणकारी आहे. ताप व उन्हाळी लागल्यास बोरांपासून आराम मिळतो. 

धोतरा : धोतऱ्याचे झाड विषारी मानले जाते. परंतु, त्यात काही औषधी गुणधर्मही आहेत. नारू, विंचू चावणे, खरूज, लखवा किंवा अर्धांगवायू अशा विकारांवर धोतऱ्याचे तेल उपयुक्त ठरते. काळा, पिवळा आणि पांढरा अशी तीन प्रकारात धोतरा आपल्याला आढळतो. पांढऱ्या धोतऱ्याचे फूल, फळ, गणपतीला प्रिय आहेत, असे म्हणतात. 

शमी : छोकर, बन्नीमर, खिजडी अशा नावांनी शमीला ओळखले जाते. आग, अतिसार, उन्हाळी लागणे, गरमी अशा विकारांवर शमीच्या शेंगा आणि पाला गुणकारी आहेत. वनवासात असताना पांडवांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरच ठेवली होती, असे महाभारतात सांगितलेले आहे. 

तुळस : वृंदा, विष्णुप्रिया, कृष्णप्रिया, सुमुखा, पूर्णसा, दिव्या आदी 21 नावांनी तुळस ओळखली जाते. श्रीविठ्ठलाला तुळस प्रिय आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीलाच केवळ तुळशीचा वापर गणेशपूजनात केला जातो. चर्मरोग, ताप, उष्णता, मूत्रविकार, संधिवात या विकारांवरही तुळस उपयुक्त आहे. तुळशीची पाने, बिया, खोड यांचा वापर त्यासाठी केला जातो. पाने व बियांचा लेप केला जातो. काढाही केला जातो. वारकरी संप्रदायातील लोक तुळशीच्या काष्ठापासून तयार केलेल्या मण्यांची माळ गळ्यात घालतात. 

विष्णुकांत : विष्णुकांतला नीलपुष्पी असेही म्हणतात. तिची फुले निळी असतात. वैकुंठातील एका दासीचे रूप म्हणून विष्णुकांता, असे मानले जाते. तिची पाने व मुळे उपयुक्त आहेत. त्यामुळे मज्जातंतू आणि मेंदूची क्षमता वाढते, असे आयुर्वेदात सांगितले आहे. 

आघाडा : आघाड्याला अपामार्ग असेही म्हणतात. अपामार्ग म्हणजे स्वच्छ करणारा. गणेश व गौरीपूजनात त्याला मानाचे स्थान आहे. पोटदुखी, कफाचा ताप, मूळव्याध, विंचू दंश यांवर आघाडा उपयुक्त आहे. आघाड्याची पाने, खोड आणि मुळ्यांचा वापर औषधी म्हणून केला जातो. 

डोरली : रानरिंगणी, ब्रिहती, महोतिका अशा वेगवेगळ्या नावांनी डोरलीचे झाड ओळखले जाते. ते वांग्याच्या झाडासारखे असते. त्याच्या मुळ्या व पाला औषधी म्हणून गुणकारी आहेत. ओकारी येणे, नारू अशा विकारांवर त्या उपयुक्त आहेत. जनावरांच्या विषबाधेवर डोरलीच्या मुळ्यांचा रस पाजला जातो. 

कण्हेर : कण्हेराचा उपयोग कुंपणासाठी केला जातो. हे झाड विषारी असते. त्याची फुले तांबडी असतात. ते गणेशाने मस्तकी धारण केल्याचे सांगितले जाते. कण्हेरीचे तेल इसबगोलावर गुणकारी आहे. 

मांदार : मांदार हा एक रुईचा प्रकार आहे. सर्वसाधारण रुईची पाने जांभळट पांढरी असतात. मांदारची फुले ही पूर्ण पांढरी असतात. मांदारलाच अर्क, क्षिरंगा, आकडो अशा नावांनी ओळखले जाते. डोकेदुखी, नारू, कानदुखी, घटसर्प, हत्तीरोगावर मांदारची पाने, चीक व धुरी उपयुक्त आहे. 

अर्जुन सादडा : इंद्रदुम, तोरमेती, कोहा या नावांनी सादडा ओळखला जातो. महाभारत काळात पांडव वनवासात गेली होती. त्या वेळी सादडा वनस्पती अर्जुनाच्या पायाखाली आली. ती मरू नये, म्हणून अर्जुनाने तिला आधार दिला. तिचे जतन केले. म्हणून तिला अर्जुन सादडा म्हणतात. वातविकार, पित्त, हाड मोडणे, हृदयविकार यावर सादडा गुणकारी आहे. 

डाळिंब : डाळिंबाला दाडिम, अनार, रक्तबीज असेही म्हणतात. त्याची साल, मुळे, पाने जंतुनाशक आहेत. नाकातून रक्त येत असल्यास व पित्त झाल्यास डाळिंब गुणकारी ठरते. डाळिंबाच्या निर्मितीविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, 'गणपतीने विघ्नासुर आणि त्याच्या गणांचा नाश केला. त्यांच्यापासून झाडे निर्माण झाली. त्या झाडांना लाल फुले आली. त्यांच्या फळांमधील दाणेही लालच होती. हे राक्षस गणपतीशी युद्ध करताना वाद्य वाजवीत होते. त्यातून 'दाडिम-दाडिंब' असा आवाज यायचा. त्यावरून या झाडांना दाडिम नावे पडले. तेच पुढे डाळिंब, दाळिंब म्हणून ओळखले जाऊ लागले. 

देवदार : देवदार वृक्ष हिमालयात आढळतो. शंभरहून अधिक वर्ष त्यांचे आयुष्य असते. सूचीपर्णी प्रकारातील ही वनस्पती आहे. देवदारची पाने काड्यांसारखी असतात. त्यांचा वापर तापावर केला जातो. 

मरूवा : मरूवा ही सुगंधी वनस्पती आहे. तिच्या पानांचा रस उष्णता, चर्मरोगावर उपयुक्त आहे. मरूवाचे तेल दातदुखी, मुरगळणे, खरचटणे यांवर गुणकारी आहे. मरूवालाच मरवा किंवा मारवा असेही म्हणतात. 

पिंपळ : पिंपळालाच अश्‍वत्थ असेही म्हणतात. कावीळ, उलट्या, खरूज, तोंड येणे, दमा, भाजणे या विकारांवर पिंपळ उपयुक्त आहे. यालाच बोधीवृक्ष असेही म्हणतात. भगवान गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यामुळे पिंपळ वृक्ष पूजनीय आहे. 

जाई : जाईची फुले नाजूक असतात. सुगंधी असतात. चमेली, प्रियंवदा, जातिपुष्प अशा नावांनी ही फुले व वनस्पती ओळखली जाते. कानातून पू येणे, चिखल्या, खरूज, स्त्रियांच्या मासिक पाळीचे विकार, दृष्टी कमजोर होणे यांवर जाईची फुले, पाने आणि मुळे उपयुक्त आहेत. 

केवडा : केवड्यालाच केतकी, केतक, गगमधूल, गंधपुष्प, गिरिप्रिया या नावांनी ओळखले जाते. पिकलेल्या केवड्यापासून अत्तर तयार केले जाते. केवड्यापासून तेलही काढतात. उष्णता, अपस्मार अशा विकारांवर केवडा गुणकारी आहे. 

अगस्ती : अगस्ती ऋषींच्या नावावरून अगस्ती वनस्पती ओळखली जाते. पुराणांतील उल्लेखानुसार, यज्ञ कार्यात होणारी पशुहत्या अगस्ती ऋषींनी थांबवली होती. त्यामुळे अगस्ती ऋषी सदैव आपल्यासोबत असावेत, अशी अनेकांची इच्छा होती. त्या इच्छेच्या पूर्तीसाठी अगस्ती ऋषींनी आपल्या तपोबलाने एक वृक्ष निर्माण केला. त्या वृक्षालाच अगस्ती नावाने संबोधले गेले. त्या झाडाची पाने, फुले, फळे यांचा उपयोग डोकेदुखी, सर्दी, सूज, कफ, अपस्मार अशा विकारांवर केला जातो. 

गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींच्या वनस्पतींचा चाणाक्षपणाने विचार केल्यास, असे लक्षात येते की, गणेशोत्सव आणि निसर्ग यांचा काही ना काही संबंध जरूर आहे. त्यामुळेच आपल्या निसर्गाच्या संवर्धनासाठी, संगोपनासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.

नव्हे तर यंदाच्या गणेशोत्सवापासून, नव्हे आताच गणेश स्थापनेपासून आपण संकल्प करूया, की 'निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे आपले सर्वांचे दायित्व आहे, कर्तव्य आहे. जबाबदारी आहे.' कारण, निसर्गच आपल्याला सर्वकाही देत असतो. जसे निसर्गाने आपल्याला गणपतीला वाहण्यासाठी पत्री अर्थात पाने दिली. वनस्पती दिल्या. त्याच वनस्पती आपल्याला फुलेही देतात. ती फुले गणपतीलाही प्रिय असतात. त्या फुलांमध्ये जाई, कमळ, मधुमालती, सोनचाफा, केवडा, बकुळ, जास्वंद, धोतरा, कण्हेरी, प्राजक्त, मोगरा, आंबा आदींचा समावेश होता.

इतकेच नव्हे तर, ऋतुमानानुसार उमलणारी सर्व फुलांचा उपयोग पूजनासाठी केला जातो. फुलांना पाहून प्रत्येकाचे मन प्रफुल्लित होते, ताजेतवाने होते. हर्षोल्हासित होते. आपल्या मनातील सर्व नकारात्मक भाव निघून जातात. सकारात्मक भावना निर्माण होते. फुले ही जणू लहान मुले असतात, याची प्रचिती येते. नाजूक, निरागस फुलांप्रमाणे लहान मुलेही असतात. सुंदर, सुरेख, निष्पाप, निष्कलंक असतात. अशा या मुलांचे आणि फुलांचे संगोपन करू या. जतन करूया. संवर्धन करूया. तरच गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू साध्य होईल. होईल ना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Mumbai Ganesh Utsav Pune Ganesh Utsav