वाजतगाजत होणार श्रींचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 August 2017

पुणे - मंगलमूर्ती मोरया उद्या (ता. २५) भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या सुमुहूर्तावर भक्तांच्या भेटीला येतोय. बाप्पाचे वाजतगाजत स्वागत करण्यासाठी गणेशभक्त तयारीला लागले आहेत. मंडप सजलेत, रस्त्यारस्त्यांवर स्वागत कमानी लागल्या आहेत. सजावटीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. श्रींस आणण्याकरिता चांदीच्या पालख्या आणि फुलांचे रथ सजविण्यात कारागीर मग्न झाले असून, ताशाच्या थर्रारात टिपरूच्या ठेक्‍यावर ढोल वाजविण्याकरिता पथकांतील तरुणाई आतुर झाली आहे.

पुणे - मंगलमूर्ती मोरया उद्या (ता. २५) भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या सुमुहूर्तावर भक्तांच्या भेटीला येतोय. बाप्पाचे वाजतगाजत स्वागत करण्यासाठी गणेशभक्त तयारीला लागले आहेत. मंडप सजलेत, रस्त्यारस्त्यांवर स्वागत कमानी लागल्या आहेत. सजावटीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. श्रींस आणण्याकरिता चांदीच्या पालख्या आणि फुलांचे रथ सजविण्यात कारागीर मग्न झाले असून, ताशाच्या थर्रारात टिपरूच्या ठेक्‍यावर ढोल वाजविण्याकरिता पथकांतील तरुणाई आतुर झाली आहे.

मानाचा पहिला - कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मंडळाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. श्रींची मिरवणूक सकाळी सव्वादहा वाजता नारायण पेठेतील हमालवाडा येथून निघेल. चांदीच्या पालखीतून ‘श्रीं’ची मूर्ती हमालवाडा-कुंटे चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-जिजामाता चौक या मार्गे उत्सव मंडपात येईल. देवळणकर बंधूंचे नगारावादन, प्रभात बॅंड, श्रीराम, आदीमाया ढोलताशा, नूमविच्या मुलांचे लेझीम पथक असेल. श्रींची प्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ५६ मिनिटांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली.

मानाचा दुसरा - तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मंडळाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यंदा चांदीच्या पालखीतून सकाळी साडेदहा वाजता ही मिरवणूक निघेल. नारायण पेठेतील न. चिं. केळकर रस्त्यावरील मंदार लॉज येथून निघून मिरवणूक कुंटे चौक-लक्ष्मी रस्ता-लिंबराज महाराज चौक-गणपती चौकातून ग्रामदैवत तांबडी जोगेश्‍वरी देवीच्या मंदिरानजीकच्या उत्सव मंडपापर्यंत येईल. आढाव बंधूंचे नगारावादन, न्यू गंधर्व ब्रास बॅंड, शिवमुद्रा, ताल पथके असतील. श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व्यावसायिक समीर शाह यांच्या हस्ते दुपारी एक वाजून १५ मिनिटांनी होईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी दिली.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ
फुलांच्या रथातून उत्सवमूर्तीची मिरवणूक सकाळी दहा वाजता निघेल. गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-बेलबाग चौकमार्गे उत्सव मंडप असा मार्ग आहे. अभिनेता अर्जुन रामपाल त्यात सहभागी होणार आहे. जयंत नगरकर यांचे नगारावादन, गर्जना, गुरुजी प्रतिष्ठान, शिवगर्जना, महिलांचे नादब्रह्म पथके असतील. प्रतिष्ठापना दुपारी बारा वाजून ४५ मिनिटांनी सुखेन शहा यांच्या हस्ते होईल. चांदीची पालखीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल, असे प्रवीण व पृथ्वीराज परदेशी यांनी सांगितले.

मानाचा चौथा तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ
फुलांच्या रथातून श्रींच्या हेमाडपंथी मूर्तीची मिरवणूक सकाळी दहा वाजता निघेल. गणपती चौक-लिंबराज महाराज चौक-अप्पा बळवंत चौक-बुधवार चौक-बेलबाग चौक येथून उत्सव मंडपापर्यंत श्रींची मूर्ती वाजतगाजत येईल. लोणकर बंधूंचे नगारावादन, नादब्रह्म, नूमवि, श्रीशिवदुर्ग, उगम ही ढोलताशा पथके असतील. श्रींची प्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते होईल. या प्रसंगी तुळशीबागेतील व्यापारीवर्गही उपस्थित राहणार आहे, अशी माहिती नितीन पंडित यांनी दिली. 

मानाचा पाचवा केसरीवाड्याचा गणपती
केसरी-मराठा ट्रस्टच्या केसरीवाड्याच्या श्रींची मिरवणूक सकाळी दहा वाजता नारायण पेठेतील माणकेश्‍वर विष्णू चौक येथून पारंपरिक पालखीतून निघेल. बिडवे बंधूंचे सनईवादन, श्रीराम ढोलताशा पथक असेल. सकाळी साडेदहा वाजता डॉ. दीपक टिळक व रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होईल, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले.  

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
श्रींच्या मूर्तीची मिरवणूक शालूकर बोळातील भाऊ रंगारी भवन येथून सकाळी आठ वाजता निघेल. १२६ वर्षांपासूनचा लाकडी रथ केळीचे खुंट आणि फुलांनी सजविण्यात येणार असून, त्याच्या समोरील रथावर वैद्य भाऊ रंगारी यांची मूर्ती असेल. खळदकर बंधूंचे नगारावादन, उमंग, समर्थ, शिवछत्रपती, श्रीराम ढोलताशा पथके असतील. श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या हस्ते सकाळी साडेअकरा वाजता होईल, अशी माहिती खजिनदार अनंत कुसूरकर यांनी दिली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई  सार्वजनिक गणपती ट्रस्ट
ट्रस्टच्या मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक सकाळी आठ वाजता निघेल. श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी दहा वाजून नऊ मिनिटांनी त्र्यंबकेश्‍वर येथील गोरक्षनाथ मठाचे गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते होईल. सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रींच्या मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्‌घाटन होईल, असे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी कळविले आहे.

अखिल मंडई मंडळ
फुलांच्या रथातून शारदा-गजाननाच्या मूर्तीची मिरवणूक सकाळी नऊ वाजता निघेल. मिरवणुकीचा मार्ग महात्मा फुले मंडई पोलिस चौकी येथून नऊ ऑगस्ट क्रांतिदिन चौक-रामेश्‍वर चौक-गोटीरामभैय्या चौक ते उत्सवमंडप असा असेल. सामाजिक संदेश देणारे नूमवि मुलींचे पथक आणि गंधाक्ष ही ढोलताशा पथके असतील, अशी माहिती संजय मते यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 pune ganesh ustav