‘मोरया..’च्या गजरात बाप्पांचे आगमन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 August 2017

सांगली - गणरायाच्या सांगली नगरीत चौदा विद्या... पासष्ट कलांचा अधिपती म्हणजेच गणपतीची आज सांगली परिसरात मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरयाऽऽऽ’च्या गजरात उत्साहात आणि भक्तिभावात अनेक घराघरांत श्रींचे आगमन झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीत गणरायांची प्रतिष्ठापना केली. यानिमित्त सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण होते.

सांगली - गणरायाच्या सांगली नगरीत चौदा विद्या... पासष्ट कलांचा अधिपती म्हणजेच गणपतीची आज सांगली परिसरात मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरयाऽऽऽ’च्या गजरात उत्साहात आणि भक्तिभावात अनेक घराघरांत श्रींचे आगमन झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाद्यांच्या गजरात आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीत गणरायांची प्रतिष्ठापना केली. यानिमित्त सर्वत्र उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण होते.

गणपतीच्या आगमनासाठी आठवड्यापासूनच बाजारपेठ सजली होती. यंदाही कर्मवीर चौक परिसरात तीन-चार दिवसांपासून स्टॉल होते. कर्मवीर चौकासह सांगली-माधवनगर रस्ता, मारुती रस्ता आदी ठिकाणीही गणेशमूर्तींचे स्टॉल सज्ज होते. मूर्तिकारांनी डिजिटल फलकांवर जाहिरातबाजी केली होती. शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे स्वतंत्र स्टॉल होते. गणेशभक्तांनी आठवड्यापूर्वीच मूर्ती पसंत करून नोंदणी केली होती. आज सकाळपासूनच गणेशभक्त स्वागतासाठी सज्ज होते. घरगुती मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी सकाळपासूनच उत्साह दिसून आला. पायी चालत, दुचाकी, रिक्षा आणि मोटारीतूनही गणरायांचे आगमन झाले. ‘गणपती बाप्पा..मोरया’चा गजर सुरू होता. अनेकांनी मुहूर्त पाहून प्रतिष्ठापना केली. सार्वजनिक मंडळांची कालपासून तयारी होती. आज सकाळपासूनच रोषणाई, सजावट पूर्ण करण्यासाठी घाई गडबड होती.

दुपारी चारनंतर मंडळांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसला. ढोल-ताशा, वाद्यांच्या गजरात मंडळांनी प्रतिष्ठापना केली. कर्मवीर पुतळा परिसर, मारुती रस्ता, हरभट रस्ता, माधवनगर रस्ता, गावभाग आदी परिसरांत अपूर्व उत्साहाचा माहोल होता. छोटे-मोठे टेम्पो, ट्रॅक्‍टर-ट्रॉली आदी वाहने सजवून मिरवणुकीने गणरायांचे स्वागत करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत रस्त्या-रस्त्यांवर उत्साह दिसला. अनेक मंडळांनी गणरायांचे फटाक्‍यांच्या आतषबाजीत स्वागत केले.

स्वागतासाठी सांगलीनगरी सर्वत्र सजली होती. साहित्याचे स्टॉल ठिकठिकाणी सजले होते. फुला-फळांचे स्टॉल, तसेच मिठाईच्या दुकानांसमोर गर्दी होती. मारुती रस्ता परिसरात दुर्वा-हराळीची विक्री सुरू असल्याचे चित्र दिसले. गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करताना मंडळांना अडथळा होऊ नये म्हणून शहर परिसरातील खड्डे मुरूमांनी भरण्यात आले होते. घरगुती, सार्वजनिक गणेश मंडळांसह अनेक शासकीय कार्यालयांतही ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना करण्यात आली. 

सोशल साईटवरही जय गणेश
फेसबुक, व्हॉटस्‌ॲपसारख्या सोशल साईटवरही गणपती बाप्पांचे भक्तिभावाने स्वागत झाले. कालपासून आगाऊ संदेश ‘फॉरवर्ड’ करण्याची लगबग दिसली. बाप्पांचे महत्त्व सांगणारे संदेश आज विविध ग्रुपवरून फॉरवर्ड झाले. सोशल साईटवरून अनेकांनी शुभेच्छा दिल्या. उत्साहींकडून गणरायासोबत ‘सेल्फी’ ला ‘लाईक’ मिळाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 sangli ganesh ustav