# BlindVadak दृष्टिहीन वादकांचे डोळस वादन!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 September 2018

पुणे - दृष्टिहीन असलो तरी काय झाले... एकदा टिपरू हातात आला की, आम्हीही वादनाच्या जल्लोषात रमून जातो... मग दृष्टिहीन असल्याचा विचारही मनात येत नाही. इतरांच्या तालात ताल मिसळून आम्हीही त्या जोशात न्याहून जातो... असं दृष्टिहीन ढोलवादक अजय शिंदे सांगत होता. शारीरिक मर्यादा बाजूला सारून तो व त्याच्यासारखे अनेक तरुण गणेशोत्सवासाठी ढोल-ताशा वादनाच्या सरावात सहभागी होत आहेत. 

अजय ‘समर्थ प्रतिष्ठान’च्या ढोल-ताशा पथकात गेल्या सहा वर्षांपासून सहभागी होत आहे. त्याचे शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयातील दृष्टिहीन मित्रही या वादनात सहभागी होत आहेत. यांच्यात काही अनुभवी आहेत, तर काही नवखे; पण आत्मविश्‍वासाच्या जोरावर आणि मेहनतीने तेही इतर तरुण-तरुणींसोबत निर्भीडपणे ढोल-ताशा वादन करत आहेत. त्यांचे वादन वाहून आम्हालाही ऊर्जा मिळत असल्याचे पथकातील इतर तरुण-तरुणींनी सांगितले.

बालाजी सूर्यवंशी गेल्या पाच वर्षांपासून ढोल वाजवत आहे. तो म्हणाला, ‘‘आम्हाला ढोल वाजवताना अडचणी येत नाहीत. कारण आम्ही वादनात सर्वकाही विसरून जातो. मी रोज दोन तासांचा वेळ काढून मी वादनासाठी येतो. इतक्‍या वर्षांचा अनुभव असल्याने मिरवणुकीतही सहभागी होत आहे.’’

आशिष शिदोरे आणि ऋषिकेश बाबर हे दोघेही नवखे आहेत. पहिल्यांदा ढोल वादन करताना अनुभव भन्नाट होता. वादन करताना एक वेगळीच  ऊर्जा संचारते, असे दोघेही सांगतात. दत्ता ढोरमारे हा गेल्या सात वर्षांपासून तो ताशा वाजवत  आहे. 

मी गेल्या सहा वर्षांपासून ढोल वाजवत आहे. सुरवातीला ढोलवादन शिकताना अडचणी आल्या; पण शिकत गेलो आणि वादनही सोपे झाले. मिरवणुकीत ढोल वाजवताना खूप छान वाटतं. एक वेगळाच अनुभव मिळतो.  
-अजय शिंदे, दृष्टिहीन ढोलवादक

गेल्या २०१२ सालापासून दृष्टिहीन व्यक्ती पथकात सहभागी होत आहेत. त्यांना शिकवताना अडचणी येत नाहीत. कारण ते अगदी सहजपणे शिकवलेली गोष्ट आत्मसात करतात. ते इतर वादकांसोबत वादनात रमतात. - सायली शिंदे, समन्वयक, समर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2018 blind vadal