Ganesh Festival : मिरवणुकीची लगीनघाई

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 September 2018

पुणे - पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी गणेश मंडळांनी केली आहे. तयारीत व्यग्र असलेले कार्यकर्ते रात्रीचा दिवस करीत आहेत. फुलांचे आकर्षक रथ, हलते देखावे, ढोल-ताशा पथके ही यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. विसर्जन मिरवणूक कमीत कमी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी पथकांची संख्या कमी करण्यासोबतच मंडळे आणि पोलिसांच्या पातळीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

पुणे - पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू असलेल्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी गणेश मंडळांनी केली आहे. तयारीत व्यग्र असलेले कार्यकर्ते रात्रीचा दिवस करीत आहेत. फुलांचे आकर्षक रथ, हलते देखावे, ढोल-ताशा पथके ही यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये ठरणार आहेत. विसर्जन मिरवणूक कमीत कमी वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी पथकांची संख्या कमी करण्यासोबतच मंडळे आणि पोलिसांच्या पातळीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

अनंत चतुर्दशीला (रविवारी) ‘श्रीं’ना वाजतगाजत निरोप देण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. बहुतांश मंडळांच्या मंडपाच्या जवळच विसर्जन रथाची तयारी सुरू आहे. मानाच्या पहिल्या व दुसऱ्या मंडळांसह काही मंडळांनी कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र पोशाख तयार करवून घेतला आहे. ‘श्रीं’च्या समोर सनई-चौघडा, नगारावादकांची नियुक्ती, बॅंड व ढोल-ताशा पथकांची निवड, ध्वजपथक, मर्दानी खेळांचे पथक, ‘श्रीं’चा रथ, चांदीची पालखी, समाजप्रबोधनात्मक संदेशाच्या फलकांची तयारी, सामाजिक संस्था व संघटनांचा सहभाग आणि कोणत्या रस्त्याने मिरवणूक मार्गस्थ करायची, यासंबंधी कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. मानाच्या व प्रमुख मंडळांसमोर वादनाची संधी मिळावी, यासाठी ढोल-ताशा पथकांचे मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसमवेत शुक्रवारी बोलणे सुरू होते. बॅंड पथकांकडून सराव करण्यात येत होता. 

मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरावी म्हणून शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या मंडळांची तयारी सुरू झाली आहे. 

महापालिकेतर्फे मुठा नदीपात्रालगतच्या घाटांवर हौद बांधले आहेत; तसेच अग्निशामक दलाचे जवान, जीवरक्षक; तसेच आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. रविवारी मिरवणूक असल्याने उद्या (ता. २२) लक्ष्मी रस्त्यावर दुपारनंतर बॅरिकेडस्‌ बसविण्यात येतील. रात्री उशिरा शिवाजी रस्ता व डुल्या मारुती चौकात मंडळांच्या विसर्जन रथांची रांग लागायला सुरवात होईल. टिळक चौकात महापालिकेचा स्वागत कक्ष उभारण्यात येईल. 

गणेशोत्सवात मंडळांतर्फे जेजुरीच्या खंडोबाला शेवटचे पाच दिवस अभिषेक असतो. तेथून मंडळांना भंडारा येतो. मिरवणुकीत बेलबाग चौक आणि टिळक चौक येथे मंडळांतर्फे भंडाऱ्याची उधळण होते. मिरवणुकीत कार्यकर्ते सलवार- झब्बा आणि मंचर पद्धतीची टोपी परिधान करून भंडाऱ्याचा मळवट कपाळावर भरतात.
-सूरज रेणुसे, विश्‍वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट 

कार्यकर्त्यांसाठी खास पोशाख
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने मंडळाने महिलांसाठी दोनशे साड्या खरेदी केल्या आहेत. गुलाबी, निळा, हिरव्या रंगातील या साड्या नेसून महिला मिरवणुकीत सहभागी होतील. पांढरा झब्बा-सलवार त्यावर भगव्या रंगाची टोपी अशी पुरुष कार्यकर्त्यांची वेशभूषा असेल. तांबा-पितळ त्वष्टा रथावर ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान होईल, अशी माहिती त्वष्टा कासार समाज संस्था मंडळाच्या उपाध्यक्ष गिरिजा पोटफोडे यांनी दिली.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2018 Ganesh Mandal prepares for Ganesh Immersion