Ganesh Festival : चैतन्योत्सव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 September 2018

आपल्या लाडक्‍या बाप्पांचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या (ता. १३) मुहूर्तावर होणार आहे. त्यासाठी पुण्यनगरी सजली असून, या चैतन्योत्सवात सर्व जण सहभागी होणार आहेत. त्यामुळे शहरात आनंदोत्सवच सुरू होणार असून, त्यासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारल्या आहेत.

देवभूमी केरळमध्ये झालेल्या प्रलयाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील गणेश मंडळांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. बुधवारी भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका पूजन झाल्यानंतर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध वस्तू व साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची पावले बाजारपेठेकडे वळली. महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, बोहरी आळी, कापड बाजार, तपकीर गल्ली, कुंभारवाडा येथील परिसर ग्राहकांच्या गर्दीने फुलला होता. तसेच, गणेश मंडळांचे कार्यकर्ते मंडप उभारणी, देखाव्याची तयारी, ‘श्रीं’च्या प्रतिष्ठापनेसाठीच्या तयारीत होते. बुधवारी दुपारी चारनंतर पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले बहुतांश पुणेकर ‘श्रीं’ची मूर्ती  घरोघरी आणत होते. गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यासाठी अनेकांनी पूजासाहित्यासह धार्मिक पुस्तके, सीडीज, कॅसेट खरेदी केल्या.

विक्रेत्या सुरेखा भंडारी म्हणाल्या, ‘‘केरळमध्ये यंदा महाप्रलय आला; परंतु कर्नाटक, रत्नागिरी, कोकणातून नारळाची आवक झाली. त्यामुळे बाप्पाच्या पूजेसाठी २० ते २५ रुपये नगाने नारळाची विक्री होत आहे. बाप्पाला अर्पण करण्यासाठी पाचपासून २१ नारळांची तोरणेही बाजारात उपलब्ध आहेत.’’  विक्रेते राजू गाजरे म्हणाले, ‘‘विड्याची पाने, दूर्वा, बेल, २१ पत्री, खारीक-खोबरे, हळदी-कुंकू, जानवे जोड, गुलाल, बुक्का यांसह बेल, तुळस, शमी आणि फळांचे वाटेही बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. कोल्हापूरहून कमळ तर गुजरातवरून केवडा मागविला आहे.’’  

नव्या कार्याची सुरवात
कुलदैवतेसमोर विडा, दक्षिणा, सुपारी ठेवून पूजा करायची. मंत्रोच्चारात ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करायची. मोदकांचा नैवेद्य दाखवायचा. सामूहिक अथर्वशीर्ष पठण करून मांगल्याच्या उत्सवाला साक्षी ठेवून नव्या कार्याची सुरवात करण्यासाठी पुणेकर तयारीला लागले आहेत. ग्राहक पेठ, शनिवारवाड्यालगतचे स्टॉल्स तसेच शहरासह उपनगरांत अनेक ठिकाणी ‘श्रीं’च्या मूर्ती विक्रीस ठेवण्यात आल्या आहेत. सामाजिक संस्था व विविध कंपन्यांनी बाप्पाची पुस्तकेही प्रकाशित केली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2018 pune ganesh ustav