नवी मंबई - गणेश विसर्जनाची मिरवणूक म्हणजे डीजेचा दणदणाट असे समीकरण अनेक वर्षांपासून आहे. त्याला नवी मुंबईत हे वर्ष अपवाद ठरले. नाशिक ढोलसह टिमकी-ताशाच्या निनादात अनंत चतुर्दशीला रविवारी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. अनेक भक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य दिले. विशेष म्हणजे तलावांतील गॅबियन बंधारा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांनी पर्यावरण रक्षणासाठी जणू साथच दिल्याचे चित्र दिसत होते.

रस्त्यावर मंडपांना मनाई, गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन एक खिडकी योजना, मोठ्या आवाजाच्या ध्वनिक्षेपकांना बंदी; अशा अनेक कारणांमुळे यावर्षी गणेशोत्सव लक्षवेधी ठरला. विसर्जन मिरवणुकाही तितक्याच लक्षवेधी ठरल्या. शहरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी अबालवृद्धांमध्येही उत्साह दिसत होता. दुपारनंतर फुलांनी सजवलेले ट्रक, हातगाड्या आणि इतर वाहनांच्या सहाय्याने वाजत-गाजत मिरवणुका निघाल्या. सण-उत्सवांमध्ये साऊंड सिस्टिममुळे नागरिकांना होणारा त्रास खपवून घेता येणार नाही, असा इशारा उच्च न्यायालयाने एका सुनावणीत दिला होता. त्याचा परिणाम मिवरणुकांमध्ये दिसत होता. मिरवणुकांमध्ये कुठेही डीजे नव्हता. पुणेरी व नाशिक ढोलच्या पथकांचा समावेश केला होता. सोबत काही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ब्रासबॅण्ड व टीमकीच्या बाजावर ठेका धरल्याचे दिसत होते. पोलिसांकडेही प्रत्येक विसर्जनस्थळ तसेच मिरवणुकांच्या ठिकाणी आवाजाची पातळी मोजण्यासाठी यंत्रे होती. त्या नोंदींची पडताळणी सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठारे यांनी सांगितले. बेलापूर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा आदी भागांत महापालिकेने तयार केलेल्या २३ तलावांवर विसर्जन करण्यात आले.
नवी मुंबई पोलिसांनी मिरवणुकीसाठी डीजे अथवा मोठ्या आवाजाच्या संगीत वाद्यांना परवानगी दिली नव्हती. भाविकांनी पोलिसांना सहकार्य करीत मिरवणुकांमध्ये कृत्रिम आवाजापेक्षा पारंपरिक संगीत वाद्यांचा समावेश केला होता. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल झाले नाहीत.
- डॉ. सुधाकर पाठारे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-१