esakal | #BappaMorya बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी दीडपर्यंत मुहूर्त
sakal

बोलून बातमी शोधा

#BappaMorya  बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी दीडपर्यंत मुहूर्त

#BappaMorya बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी दुपारी दीडपर्यंत मुहूर्त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सव यंदा ११ दिवसांचा असून; भाद्रपद शुद्ध तृतियेला अर्थात उद्या (ता. १२) हरितालिका पूजन आहे. चतुर्थीला (ता. १३) गुरुवारी पहाटे ब्राह्म मुहूर्तापासून दुपारी दीडपर्यंत मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. 

कुलाचाराप्रमाणे प्रथम घरातील कुलदैवतांची पूजाअर्चा झाल्यावर श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येते. घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे श्रींची प्रतिष्ठापना केली जाते. दाते म्हणाले, ‘‘गुरुवारी सूर्योदयापासून दुपारी दोन वाजून ५२ मिनिटांपर्यंत भद्रा हे करण येत आहे. मात्र, गणेशाच्या प्रतिष्ठापनेसाठी भद्रा दोष मानू नये. आपल्या घरी जितके दिवस श्रींचा उत्सव असेल तितके दिवस सकाळी पूजा व रात्री आरती मंत्रपुष्पांजली म्हटल्याने घरामध्ये प्रसन्नता येते. घरगुती प्राणप्रतिष्ठापनेची श्रींची मूर्ती साधारणतः एक वीत म्हणजे सहा ते सात-आठ इंच उंचीची असावी.  श्रींची पूजेची मूर्ती आसनस्थ आणि सुबक तसेच मातीची किंवा शाडूची असावी.’’ 

‘‘भाद्रपद शुद्ध षष्ठीला म्हणजे शनिवारी (ता.१५) अनुराधा नक्षत्र संपूर्ण दिवसभर आहे. त्यामुळे दिवसभरात केंव्हाही ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मींचे आवाहन करता येईल. रविवारी (ता. १६) ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीपूजन व भोजनाचा दिवस आहे. सोमवारी (ता. १७) दिवसभर मूळ नक्षत्र असल्याने, केंव्हाही उत्तरपूजा करून गौरी विसर्जन करता येईल,’’ असेही दाते यांनी सांगितले.