Ganesh Festival : आनंदोत्सव

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 September 2018

पुणे - बाप्पासाठी उभारलेल्या मंडप-शामियानात मांगल्यमय सनईची मंजूळ सुरावट, पारंपरिक वेशभूषेत आबालवृद्धांनी केलेली गर्दी, ढोल-ताशांचा न्यारा नाद अन्‌ या नादावर थिरकरणारी पावले... अशा भक्तिमय वातावरणात गुरुवारी गणेशोत्वाच्या आनंदपर्वाला सुरवात झाली. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरी ‘श्रीं’ची उत्साहात प्रतिष्ठापना झाली.   

बाप्पाच्या आगमनामुळे सकाळपासूनच शहरात उत्साही व आनंदी वातावरण होते. मानाच्या पाच मंडळांसह प्रमुख मंडळांच्या; तसेच पेठा-पेठांतील अनेक मंडळांच्या मिरवणुका दिवसभर काढण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना मंडळांतर्फे करण्यात येत होती. 

अनेक नागरिकांनी कुटुंबीयांसमवेत गुरुवारी सकाळी प्रतिष्ठापनेसाठी घरोघरी ‘श्रीं’ची मूर्ती आणली. लाडक्‍या बाप्पाला नैवेद्यासाठी घरोघरी उकडीचे मोदक करण्यात आले होते. काहींच्या प्रथा, परंपरेनुसार पंचपक्वानांचा नैवेद्यही ‘श्रीं’ना दाखविण्यात आला.  

लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्टच्या (विंचूरकर वाडा) ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकात देशमुख यांच्या हस्ते झाली. अनेक मंडळांच्या मिरवणुका सकाळीच निघाल्या. त्या वेळी मध्यवर्ती भागात पुणेकरांसह परदेशी नागरिकांनी ‘श्रीं’ची छबी कॅमेऱ्यात टिपली.    

बॅंडच्या सुरावटीत देशभक्तीपर आणि मंगलमूर्तींच्या गाण्याच्या सुरावटी कानावर पडत होत्या. मात्र, चौका-चौकांमध्ये तसेच अनेक रस्त्यांवर मुख्य आकर्षण होते ते ढोल-ताशा पथकांच्या वादनाचे. अनेक पथकांनी बसविलेल्या नव्या तालांची सलामी ‘श्रीं’ना दिली. ढोल-ताशा पथकांनी शहर निनादून सोडले.  

मंडळांचे बाप्पा चांदीच्या व लाकडी पालखीतून; तसेच आकर्षक फुलांच्या रथावर विराजमान झाले होते. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी देखील पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पासहित प्रमुख मंडळांच्या ‘श्रीं’चे दर्शन घेतले. तसेच गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. सोशल मीडियावरूनही शुभेच्छांचा वर्षाव होत होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Celebration