Ganesh Festival : मानाचे पाचही मंडळे ठेवणार 15 मिनिटांचे अंतर 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 September 2018

पुणे - अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीचा वेळ कमी व्हावा. अन्य मंडळांनाही मिरवणुकीत सहभागी होता यावे, यासाठी मानाच्या पाच मंडळांची ढोल-ताशा पथके यंदा बेलबाग चौकातून वादनास सुरवात करतील आणि प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने मुख्य मिरवणूक मार्गावरून मार्गस्थ होतील, असा महत्वपूर्ण निर्णय मानाच्या पाचही मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी घेतला. 

पुणे - अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीचा वेळ कमी व्हावा. अन्य मंडळांनाही मिरवणुकीत सहभागी होता यावे, यासाठी मानाच्या पाच मंडळांची ढोल-ताशा पथके यंदा बेलबाग चौकातून वादनास सुरवात करतील आणि प्रत्येकी पंधरा मिनिटांच्या अंतराने मुख्य मिरवणूक मार्गावरून मार्गस्थ होतील, असा महत्वपूर्ण निर्णय मानाच्या पाचही मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी घेतला. 

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सवाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर यांच्यासह प्रशांत टिकार, सौरभ धडफळे, प्रसाद कुलकर्णी, हृषिकेश नेऊरगांवकर, नितीन पंडित उपस्थित होते. 

शेटे म्हणाले, ""लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोरून मुख्य मिरवणूक सकाळी साडेदहा वाजता सुरू होईल. पाचही मंडळांची पथके श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर येथे थांबतील. पालकमंत्री, महापौर, आयुक्तांच्या हस्ते "श्रीं'ची आरती झाल्यावर पालखी व रथ थेट बेलबाग चौकात येऊन थांबेल. तेथून पुढे पथकांचे वादन सुरू होईल. कसबा गणपती मार्गस्थ झाल्यावर पंधरा मिनिटांनी बेलबाग चौकात तांबडी जोगेश्‍वरीचा गणपती येईल. त्यानंतरच्या पंधरा मिनिटांनी गुरुजी तालीमचा गणपती, असे प्रत्येक पंधरा मिनिटांनंतर मानाचे पाच गणपती बेलबाग चौकातून मुख्य मिरवणुकीत मार्गस्थ होतील. डॉ. रोहित टिळक यांच्याशीही यासंदर्भात चर्चा झाली आहे.'' 

धडफळे म्हणाले,""2015 पासून पाचही मंडळांनी हौदातील पाण्यात "श्रीं'च्या मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. तो यंदाही कायम ठेवला आहे.'' 

""पोलिसांच्या आवाहनाला मानाची मंडळे प्रतिसाद देतात. मात्र, त्यांनीही मिरवणूक सुरू असताना हस्तक्षेप करू नये,'' अशी अपेक्षा परदेशी यांनी व्यक्त केली. 

""बाहेरगावचे तरुण येऊन मिरवणुकीत नाचतात. त्यामुळे मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला विलंब होतो. हा विलंब टळण्यासाठीच पंधरा मिनिटांच्या अंतराने एकापाठोपाठ येण्याचा निर्णय घेतला आहे,'' असे खटावकर यांनी सांगितले. पंडित म्हणाले, ""मानाच्या गणपतींची मिरवणूक जेवढी लवकर मार्गस्थ होईल तेवढेच अन्य मंडळांना मिरवणुकीत लवकर सहभागी होता येईल.'' 

प्रत्येक मंडळात तीन पथके असतील. त्यामध्ये 40 ढोलवादक, 15 ताशावादक आणि दहा ध्वजधारी असतील. पारंपरिक पद्धतीनेच मिरवणूक दिमाखदार पद्धतीने निघेल. 
- श्रीकांत शेटे, अध्यक्ष, कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सोव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Main five ganesh mandal 15 minute distance