Ganesh Festival : मानाच्या मंडळांची दीडपूर्वीच प्रतिष्ठापना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 September 2018

तुतारीची ललकार, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, शंख निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. दुपारी दीडपूर्वीच मानाच्या पाचही मंडळांच्या गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली. 

 मानाचा पहिला  - कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 

तुतारीची ललकार, पारंपरिक वेशभूषेतील कार्यकर्ते, शंख निनाद आणि ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या ‘श्रीं’चे गुरुवारी आगमन झाले. दुपारी दीडपूर्वीच मानाच्या पाचही मंडळांच्या गणरायाच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाली. 

 मानाचा पहिला  - कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी ऊर्फ सुरेश जोशी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना झाली. जोशी यांच्या हस्ते अभिनेते सुबोध भावे, प्रकाश दंडगे (गुरुजी), डॉ. योगेश बेंडाळे, शिरिन लिमये आदींना ‘कसबा गणपती पुरस्कारा’ने, तर ‘भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कारा’ने ॲड. भास्करराव आव्हाड यांना सन्मानित करण्यात आले.

मानाचा दुसरा - तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 

पांढऱ्या शुभ्र वेशभूषेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी चांदीच्या पालखीतून श्रींची मिरवणूक काढली. दुपारी साडेबारा वाजता रावेतकर ग्रुपचे अमोल रावेतकर यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली. पुणेरी पगडी आणि शंख निनाद हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य होते. पारंपरिक वेशभूषेत आबालवृद्धांसह तरुणाई मिरवणुकीत सहभागी झाली होती. ‘गणपती बाप्पा’च्या जयघोषात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मानाचा तिसरा - गुरुजी तालीम मंडळ 
मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या पत्नी संध्या (वय ५६) यांचे बुधवारी रात्री ११ वाजता निधन झाले. त्यामुळे मंडळाने नियोजित ढोल-ताशा पथके रद्द केली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाची जबाबदारी स्वीकारली. श्रींच्या मिरवणुकीत केवळ नगारावादन आणि अश्‍वराज बँडपथक होते. उद्योगपती आदित्य शर्मा यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली.

मानाचा चौथा - तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ   

फुलांच्या रथात विराजमान झालेल्या हेमाडपंती गणरायाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि बाप्पासोबत सेल्फी घेण्याचा आनंद मिरवणुकीत पुणेकरांनी घेतला. श्रींची प्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता जन्मेजयराजे भोसले व तुळशीबागेतील व्यापाऱ्यांच्या हस्ते झाली. प्राणप्रतिष्ठापनेच्या प्रसंगीच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा दूरध्वनी भोसले यांना आला. लतादीदींचा संदेश स्पीकरवरून उपस्थितांना ऐकविण्यात आला. त्या वेळी त्यांनी लहानपणी दीनानाथ मंगेशकर यांच्याबरोबर तुळशीबागेतल्या गणपतीच्या दर्शनाला येत असल्याची आठवण सांगितली.  

मानाचा पाचवा - केसरीवाडा गणपती 

केसरी-मराठा ट्रस्टच्या केसरीवाड्याच्या गणपती उत्सवाचे यंदा १२५ वे वर्ष आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने श्रींची मिरवणूक यंदा माणिकविष्णू चौक-उंबऱ्या गणपती चौक-शेडगे विठोबा चौकातून माती गणपती मंदिरावरून उत्सव मंडपात आणण्यात आली. पारंपरिक लाकडी पालखीत बाप्पा विराजमान झाले होते. सकाळी साडेअकरा वाजता डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली.   

प्रमुख मंडळे...
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती   

स्वातंत्र्यपूर्व काळातील लाकडी रथातून ‘श्रीं’ची मिरवणूक काढण्यात  आली. श्री क्षेत्र देहू संस्थानचे विश्‍वस्त बाळासाहेब मोरे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना झाली. श्री शिवाजी मर्दानी पथकातील तरुणाईने सादर केलेली प्रात्यक्षिके मिरवणुकीचे आकर्षण ठरली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती 

‘श्रीं’ची प्रतिष्ठापना डॉ. धुंडिराज पाठक यांच्या हस्ते झाली. तत्पूर्वी फुलांच्या रथातून ‘श्रीं’ची दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. मानिनी महिला ढोल-ताशा पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होताच नारळाचे तोरण वाहण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पहिल्याच दिवशी बेलबाग चौकामध्ये सुरक्षा व्यवस्था होती. 

अखिल मंडई मंडळ 

मंडळाचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. शारदा गजाननाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आल्यानंतर बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना झाली. शारदा गजाननावर चौकाचौकांत पुष्पवृष्टी करण्यात आली. 

हुतात्मा बाबू गेनू मंडळ    

‘श्रीं’च्या मिरवणुकीत पांढऱ्या शुभ्र वेशभूषेत असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना झाली. ‘श्रीं’चे लोभस रूप डोळ्यांत टिपण्यासाठी मिरवणूक मार्गांवर पुणेकरांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Main five ganesh mandal in pune