Ganesh Festival : जागर सर्वधर्मसमभावाचा!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 September 2018

कोल्हापूर - ‘लेक वाचवा-देश वाचवा’, ‘जय जवान-जय किसान’, असा संदेश देत यंदा मोरेवाडी परिसरातील कुईगडे बंधूंनी घरातील बाप्पासाठी बाबूजमाल दर्ग्याची प्रतिकृती साकारली आहे.

कोल्हापूर - ‘लेक वाचवा-देश वाचवा’, ‘जय जवान-जय किसान’, असा संदेश देत यंदा मोरेवाडी परिसरातील कुईगडे बंधूंनी घरातील बाप्पासाठी बाबूजमाल दर्ग्याची प्रतिकृती साकारली आहे. दर्ग्याच्या या प्रतिकृतीतूनच बुलेटवरून त्यांनी शाहूपुरी कुंभार गल्लीतून बाप्पांच्या आगमनाची मिरवणूक काढली. सर्वधर्मसमभावाचा जागर करीत ही मंडळी मोरेवाडीत पोचली.

संदीप कुईगडे बांधकाम व्यावसायिक असून राजू कुईगडे एका कारखान्यात नोकरीला आहेत. घरी आईस्क्रिम पार्लर असून कुईगडे परिवार हे दुकान चालवते. प्रत्येक वर्षी घरातील बाप्पांसाठी वेगळ्या पद्धतीची आरास करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. कधी निसर्गात रमणारा बाप्पा तर कधी स्वामी समर्थ, साईबाबांच्या रूपातील गणेश साकारून आध्यात्मिक आनंद देणारी सजावट हा परिवार करतो. 

 

यंदा मोहरम व गणेशोत्सवाची धूम एकाच वेळी असल्याने त्यांनी बाबूजमाल दर्ग्याच्या प्रतिकृतीत बाप्पांना विराजमान करून सजावट केली आहे. या प्रतिकृतीवरून त्यांनी विविध सामाजिक संदेशही दिले.

कुईगडेंचे आजोळ रंकाळा परिसरात. त्यांचे मामा धनाजी कारंडे रंकाळा टॉवर धुण्याची चावी परिसरातील शहाजमाल दर्ग्याची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे मोहरमच्या सणातही ही मंडळी प्रत्येक वर्षी तितक्‍याच तन्मयतेने सहभागी होतात. आज त्यांनी घरी बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली तर उद्या (शुक्रवारी) मामांकडे जाऊन पंजाची प्रतिष्ठापना करणार आहेत. त्यांची चौथी पिढी यंदा गणेशोत्सवाबरोबरच मोहरम सण साजरा करणार आहे. 

मोफत रिक्षा प्रवास
गणेशभक्त आरिफ रशिद पठाण यांनी यंदाही गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत रिक्षा सेवा दिली. त्यांच्यासह एकूण २० रिक्षा व्यावसायिक या उपक्रमात सहभागी झाले. विकी देसाई, शेखर कोळेकर, विलास लोहार, जीवा खांडेकर, सुहास शेटे, दीपक पोवार, उदय निंबाळकर, प्रकाश पोवार, प्रदीप जाधव, अमर मुधाळे, जयसिंग खांडेकर, प्रफुल्ल खंदारे, अल्ताफ मुल्ला, सुरेश करले, बाळासाहेब पाटील, राजकुमार ढवळे, राजाराम पाटील, सचिन किळूस्कर, पप्पू खाडे या रिक्षा व्यावसायिकांनी मोफत रिक्षा सेवा दिली. सतीश सारवतकर, जयंत जाधव, प्रवीण पोवार यांचे सहकार्य त्यांना मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Moharam integration special