Ganesh Festival : निपाणी तालुक्‍यातील बोरगाववाडीत हिंदू बांधवांकडून मोहरमचा लोकोत्सव

अमोल नागराळे
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

निपाणी - बोरगाववाडी (ता. निपाणी) येथे एकही मुस्लिम कुटुंब नसताना हिंदू बांधवांकडून मोहरम साजरा केला जातो. ग्रामदैवत नालपीरबाबा देवाच्या श्रद्धेपोटी चावडी आवारात होणारा मोहरम हा गावचा मुख्य लोकोत्सव बनला आहे.

निपाणी - बोरगाववाडी (ता. निपाणी) येथे एकही मुस्लिम कुटुंब नसताना हिंदू बांधवांकडून मोहरम साजरा केला जातो. ग्रामदैवत नालपीरबाबा देवाच्या श्रद्धेपोटी चावडी आवारात होणारा मोहरम हा गावचा मुख्य लोकोत्सव बनला आहे. मोहरमची परंपरा जपताना बोरगाववाडीकरांनी समतेचा, राष्ट्रभावनेचा, सौहार्दतेचा आणि सामाजिक सलोख्याचा संदेश सर्वदूर पोचविला आहे.

कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरील ढोणेवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या बोरगाववाडीची लोकसंख्या दोन हजारावर आहे. गावात लिंगायत समाज बांधव बहुसंख्येने आहेत. एकही मुस्लिम कुटुंब नाही, तरीही गावात मोहरम हिंदू बांधवांकडून करण्याची परंपरा आहे. गावचावडीत परंपरेनुसार ६ पीर ठेवलेले असतात. 

तेथेच फकिरांकडून देवाची सेवा चालते. नालपीरबाबांची यात्रा गावकऱ्यांकडून दरवर्षी मोहरमनिमित्त साजरी होते. येथील मोहरमसाठी महिनाभर अगोदर उत्सव कमिटीसह गावकरी तयारीत व्यस्त असतात. 

उत्सवाचा एकूण दहा दिवस काळ असला तरी सहाव्या दिवसांपासून कार्यक्रमांना सुरुवात होते. पाचव्या दिवशी पीर बांधणे, पीर बसविणे असा कार्यक्रम होतो. मोहरमदिवशी मुख्य यात्रा भरते. यावेळी मुख्य मानकरी रावसाहेब धोंडीबा खोत यांनी ऊद वाहिल्यावर पीर उठविण्याची परंपरा आहे. पिराची गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीवेळी फकीर, मानकऱ्यांसह पिराला भाविक जल वाहतात.

उत्सवाच्या आठव्या दिवशी गंध चढविण्याचा कार्यक्रम होतो. नवव्या दिवशी कत्तलरात्र असते. यादिवशी देवाला सुमारे ५ हजार फेटे लावले जातात. उत्सवाच्या सहाव्या दिवसापासून गावकरी पाहुणे, मित्रमंडळींना यात्रेसाठी निमंत्रित करतात. उत्सवात फकीर, मानकरी, वाजंत्री यांना घरोघरी बोलावून अन्नदान करण्याची पद्धत आहे. कळंत्रे मळ्यातील विहिरीत ताबूत विसर्जनाने उत्सवाची सांगता होते.

नालपीरबाबा देवाचे मानकरी व फकीर परंपरेने हिंदू बांधव आहेत. फकीर म्हणून प्रकाश कळंत्रे, भूपाल टाकमारे, अनिल थकान, महादेव टाकमारे, पांडू सोनार, रावसाहेब देवाळे, पुंडलिक खोत परंपरेने सेवा बजावतात. रावसाहेब खोत यांना ऊद वाहण्याचा मान आहे. दयानंद खोत, विजय माने, नरसू खोत, बाळासाहेब खोत, शिवगोंडा करडे, कलाप्पा गुळगुळे देवाचे मानकरी आहेत. त्यांना पीर धरण्याचा मान आहे. उत्सवात बोरगाव येथील इलाई मुजावर हे एकमेव मुस्लिम बांधव सहभागी होतात.

मुस्लिम कुटुंब नसताना बोरगाववाडीत मोहरम हिंदू बांधवांकडून साजरा केला जातो. सुमारे चारशे वर्षांपासून गावात ही परंपरा रुजल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येते. वडिलोपार्जित चालत आलेली उत्सवाची परंपरा नवीन पिढी नेटाने पार पाडत आहे. गावात जातीबद्दल कोणाच्या मनात भेदभाव नाहीत. मतभेद विसरून उत्सव साजरा होतो. गावाबाहेर नोकरीसह अन्य कामासाठी असणारे बांधवही आवर्जून खास उत्सवासाठी उपस्थित होतात.
- रावसाहेब खोत,
मानकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Moharam integration special