Ganesh festival : मेरे मालिक, मेरे मौला.. बाप्पा मोरया!

मिलिंद देसाई
Friday, 21 September 2018

बेळगाव - बेळगाव शहराला मोठी परंपरा असून शहरात धार्मिक सलोख्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. शहराला लागून असलेल्या काही गावांमध्येही हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांच्या सण, उत्सवामध्ये अनेक वर्षांपासून सहभागी होत धार्मिक सलोखा जपत आहेत

बेळगाव - बेळगाव शहराला मोठी परंपरा असून शहरात धार्मिक सलोख्याची अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. शहराला लागून असलेल्या काही गावांमध्येही हिंदू-मुस्लिम बांधव एकमेकांच्या सण, उत्सवामध्ये अनेक वर्षांपासून सहभागी होत धार्मिक सलोखा जपत आहेत. शहरापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेले हलगा गाव देखिल हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

हलगा गावामध्ये मराठा समाजाची संख्या जादा आहे. गावात १२ मुस्लिम कुटुंबे आहेत. तसेच गावातील मराठा व जैन समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मुस्लिम बांधव विविध प्रकारचे व्यवसाय करीत आहेत. गावात अनेक मंदिरे असली तरी गावातील सर्वधर्मियांचा हजरत बीबी फातिमा हा दर्गा श्रद्धास्थान आहे. त्यामुळेच दर्गामध्ये दर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते. दर्गाचा मुख्य पुजारी हिंदू असून मोहरममध्ये काढण्यात येणारी पंजा मिरवणूकही हिंदू व मुस्लिम बांधव एकत्रितपणे काढतात. दर्गामधील सर्व विधी हिंदू पद्धतीनेच केल्या जातात. 

देशात इंग्रजांची सत्ता येण्यापूर्वीपासून हलगा गावातील हिंदू बांधव मोहरममध्ये सहभागी होत आले आहेत. मोहरमदिवशी गावात मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी केले जाते. या काळात हिंदू बांधव हजारोंच्या संख्येने दर्गामध्ये जाऊन दर्शन घेतात तसेच नवस फेडतात.

गावात मराठा समाजाबरोबरच जैन, मुस्लिम व इतर समाजाचे लोक गणेशोत्सव व इतर सणामध्ये सहभागी होतात. गावाच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही धार्मिक सलोखा बिघडलेला नाही. या वर्षी गणेशोत्सव काळात मोहरम आला आहे. त्यामुळे गावात गणेशोत्सव व मोहरम आनंदाने साजरा करण्यात येत आहे. गावातील दर्ग्याचा इतिहास आजच्या पिढीला माहीत नाही मात्र गावातील सर्वांची दर्गा शरीफवर मोठी श्रद्धा आहे.

हलगा गावातील लोकांची जमीन संपादित करून हलगा गावाजवळ सुवर्ण विधानसौध बांधण्यात आली आहे. त्यामुळे हलगा गाव आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. मात्र आजही गावातील लोकांनी भाषिक व धार्मिक एकता कायम ठेवत एकमेकांना मदत करण्याचे कार्य कायम ठेवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Moharam integration special