बेळगाव - सर्रास ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनच देखावे सादर केले जातात पण बेळगावातील रयत गल्ली, वडगाव येथे घराघरांत देखावे सादर करण्यात येत आहेत. ही परंपरा 1995 पासून सुरू आहे. प्रत्येक घरात सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्यास सुरवात झाली आहे. यंदाही रयत गल्लीतील रहिवाशांनी एकापेक्षा एक सुंदर असे देखावे केले असून ते पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे.

शहरातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून दरवर्षी आकर्षक आणि सुंदर देखावे सादर केले जातात. देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न होतो. देखाव्यांसाठी मोठ्या प्रमाणात खर्चही करावा लागतो. त्यामुळे काही जणांचा अपवाद वगळता घरात अधिक प्रमाणात खर्च करून देखावे सादर केले जात नाहीत. मात्र रयत गल्ली, वडगाव येथील नागरिक 15 वर्षांपासून घरामध्ये देखावे सादर करीत आहेत. त्यामुळे रयत गल्लीतील देखाव्यांची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली असते.
गल्लीतील राजू मरवे यांनी यशोदामाई श्रीकृष्णाला हातावर खेळवत असल्याचा देखावा सादर केला आहे, तर प्रीतेश होसुरकर यांनी उचगाव येथील मळेकरणी देवीचा परिसर, उत्तम होसुरकर यांनी दोऱ्यातून पडणारे पाणी, कुमार बिर्जे यांनी लाल किल्ला, सौरभ रेडेकर यांनी आषाढी वारीतील रिंगण, राजू लोहार यांनी 1979 मधील नंदिहळ्ळीतील लोहार शाळेचा देखावा सादर करून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच संतोष काजोळकर, नरेश तारीहाळकर, नागेंद्र काजोळकर, बंडू बिर्जे, यल्लाप्पा तारीहाळकर, परशराम केरवाडकर आदींनी घरामध्ये आकर्षक देखावे सादर केले आहेत.
1995 पासून प्रत्येक घरात गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेबरोबरच देखावे सादर करण्याची परंपरा सुरू झाली, ती आजही सुरू आहे. चांगल्या प्रकारचे देखावे एकाच गल्लीत पाहता येतात, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी गर्दी होत असून घराघरांत देखावे करण्याची पद्धत रयत गल्लीतच दिसून येते.
- राजू मरवे, रहिवासी