
विहिरीतील पाणी काढण्यासाठी गुरुवारी सुरवात केली. ता. 15 च्या सायंकाळपर्यंत पाणी काढले जाईल. ता. 16 ला गाळ काढून 17 आणि 18 सप्टेंबरला पुन्हा विहिरीत शुद्ध पाणी सोडले जाईल. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली आहे.
- एन. पी. गायकवाड, उपअभियंता, महापालिका, औरंगाबाद.
औरंगाबाद : गणरायाचे आगमन काल थाटात झाले. मात्र, आज दीड दिवसांच्या गणेशाचे विसर्जन करायला गेलेल्या नागरिकांची पंचाईत झाली. अस्वच्छ विहिरींमुळे नागरिकांनी विहिरीच्या बाजूला मूर्ती ठेऊन कोरडचे विसर्जन केले. ही बाब समजताच शुक्रवारी (ता. 14) सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. यावेळी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी झाली.
सिडको-हडको येथील नागरिकांसाठी गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी एन. बारा येथील विहिरीत महापालिका प्रशासनाने व्यवस्था केली आहे. मात्र, त्याठिकाणी विहिरीची स्वच्छताच नव्हती. आज दुपारी गणेश विसर्जनासाठी आलेल्या भक्तांचा हिरमोड झाल्याने शेवटी त्यांनी बाजुलाच असलेल्या पायऱ्यावर गणेशमूर्ती ठेऊन कोरडे विजर्सन केले. त्यानंतर मनसैनिकांना माहिती मिळताच आंदोलन सुरु केले. जोपर्यंत विजर्सनासाठी चांगल्या पाण्याची व्यवस्था होणार नाही. तोपर्यंत इथून उठणार नाही. असा पवित्रा मनसेने घेतला. अखेर महापालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात एक हजार लिटरची पाण्याची टाकी उपलब्ध करत त्यात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
आंदोलनात संघटक बिपीन नाईक, संदीप कुलकर्णी, शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, उपाध्यक्ष आशिष सुरडकर, गजनगौडा पाटील, चेतन पाटील, राजीव जावळीकर, ऍड. निनाद खोचे आदींची उपस्थिती होती.
विहिर सातव्या दिवशी उपलब्ध
महापालिका जाणून बुजून हे करत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी केला. तसेच महापालिकेतर्फे विहिरीतील गाळ काढण्यासाठी 9 सप्टेंबरला ऑर्डर मिळाली, असे कंत्राटदार प्रभाकर मोहिते यांनी "सकाळ'ला सांगितले. या अनागोंदी कारभारामुळे गणेश प्रतिष्ठापनेनंतर सातव्या दिवसांपासून विसर्जन करण्यासाठी ही विहिर उपलब्ध होणार आहे.