खव्याच्या मोदकांत विविध स्वाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

सातारा - दुधाचे दर वाढले, तरी साखरेचे दर किलोला किमान दहा रुपयांनी कमी झाल्याने बाप्पाचे खाद्य असलेल्या मिठाईंच्या दुकानातील मोदकांचे दर यावर्षी वाढलेले नाहीत. त्यामुळे उकडीच्या आणि तळलेल्या या पारंपरिक मोदकांबरोबरच आणखी नावीन्यपूर्ण प्रकार उत्पादकांनी विक्रीसाठी आणले असून, विविध स्वादांमध्ये (फ्लेवर) मोदक नागरिकांना गेल्या वर्षीच्याच दरात मिळणार आहेत. 

यावर्षी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आल्याने दूध उत्पादकांना दुधाचे दर काही प्रमाणात वाढवून मिळाले. घरोघरी गणरायासाठी पारंपरिक पद्धतीने उकडीचे आणि तळलेले मोदक केले जातात, तसेच अनेक गृहिणी दूध मलाई, खवा यापासूनही उत्कृष्ट मोदक घरीच करतात. प्रसाद आणि नैवेद्यासाठी नागरिक मिठाईच्या दुकानातून आवर्जून मोदक आणतात. आता या गणरायाच्या आवडत्या मोदकातही मिठाई तयार करणाऱ्यांनी विविध ‘फ्लेवर’ आणले आहेत. आंबा, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, गुलकंद, पिस्त्याच्या स्वादासह खव्याचे मोदक तयार केले आहेत. त्यामुळे मोदकाची लज्जत आता आणखी वाढू लागली आहे. गणेशोत्सवात घरोघरी मोदक बनविण्यात येत असले, तरी बाजारातील तयार मोदकांना मागणी वाढत आहे. 

येथील विक्रेते उकडीचे मोदक फारसे करत नाहीत. मात्र, आंबा, पिस्ता, स्ट्रॉबेरी या स्वादातील मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या लहान- मोठ्या आकारातील मोदक विक्रेत्यांनी आकर्षक स्वरूपात मांडले आहेत. या संदर्भात ‘सकाळ’शी बोलताना योगेश सब्बरवार (मोदी) म्हणाले, ‘‘मोदक खरेदीस नागरिकांचा प्रतिसाद नेहमीच चांगला मिळतो. दुधाच्या दरात वाढ झाली असली, तरीही साखरेचे दर बऱ्यापैकी उतरले आहेत. साखर ४२ रुपयांवरून ३२ रुपयांनी मिळू लागली आहे. त्यामुळे मोदकांच्या दरात यंदा वाढ झालेली नाही.’’

मावा केशरी मोदक -     ४८० रुपये प्रतिकिलो
आंबा, पिस्ता, गुलकंद, 
स्ट्रॉबेरी, चॉकलेट मोदक -     ५२० रुपये प्रतिकिलो

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2018 modak Sweet