गणेशोत्सव2019 : गौरी झाल्या अधिक देखण्या

राजेंद्रकृष्ण कापसे
Thursday, 5 September 2019

अमेरिकेतूनही मागणी
नवगिरे यांच्या गौरीला यापूर्वी लंडनहून मागणी आली होती. यंदा १२ जोडीची अमेरिकेतून मागणी आली आहे. फायबरच्या मूर्ती वजनाला हलक्‍या असतात. तसेच, त्या टिकाऊदेखील असतात. त्यामुळे यांची किंमत १४ हजारांपासून १८ हजारांपर्यंत आहे. तसेच, पाळण्यावर बसलेल्या तीन आकारांतील गौरीही त्या तयार करतात. या व्यवसायामुळे आठ जणांना रोजगार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सव2019 : कर्वेनगर - गणपतीसोबत सण असतो तो गौरीचा. गौरीच्या पारंपरिक मूर्तीमध्ये आता आमूलाग्र बदल झाला असून, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून ते फायबरपर्यंत मूर्ती बाजारात आल्या आहेत. यंदा हाताच्या बोटांमध्ये सूट असलेल्या मूर्ती महिलावर्गाचे खास आकर्षण ठरत आहेत. गौरीला सजविताना अंगठी, अंगठीशी निगडित दागिने घालता येतील. हातावर मेहंदीसारखी डिझाइन असल्याने यंदा गौरीच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.

कर्वेनगर परिसरातील संध्या नवगिरे या गेल्या चाळीस वर्षांपासून विविध प्रकारच्या गौरीच्या मूर्ती तयार करतात. चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी गौरीसाठी कंठीहार बनवण्याची सुरवात केली, त्यानंतर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती खूप जड असतात, त्यांची तूटफूट जास्त होते. यावर उपाय म्हणून त्यांनी फायबरपासून गौरींच्या मूर्ती तयार करण्यास सुरवात केली. मुखवटा, दोन हात, छातीचा भाग आणि पोटापासून खाली पायाचा भाग, अशा एकूण सहा भागांत ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. साधारणतः या मूर्ती अडीच ते पाच फुटांपर्यंत उंच आहेत. फायबरच्या मूर्तींना मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमधून मागणी असल्याचे नवगिरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Gauri Ganpati