विसर्जनासाठी हिंगोलीत लाखो भाविक दाखल

मंगेश शेवाळकर
Sunday, 23 September 2018

हिंगोली : हिंगोली येथील मोदकाचा तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी रविवारी (ता. 23) राज्यासह  बाहेर राज्यातील लाखो भाविक शहरात दाखल झाले आहेत.

हिंगोली : हिंगोली येथील मोदकाचा तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी रविवारी (ता. 23) राज्यासह  बाहेर राज्यातील लाखो भाविक शहरात दाखल झाले आहेत.

हिंगोली येथील मोदकाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिंतामणी गणपतीचा नवसाचा मोदक घेण्यासाठी आज पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारपर्यंत सुमारे एक लाखापेक्षा अधिक भाविक शहरात दाखल झाले. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. शहरातील इंदिरा गांधी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय जवाहर रोड मार्गावरही चार चाकी वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली. शहरात दाखल झालेल्या भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी चहा पाणी नाष्टा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेत उभे राहण्यापासून ते गणपती मंदिरात दर्शन होईपर्यंत सुमारे अर्धा कीलो अंतरापर्यंत चहापाणी व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात झाली असून पोलीस अधीक्षक योगेश कुमार, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक उदयसिह चंदेल यांच्यासह मोठा ताफा बंदोबस्तावर आहे.

दरम्यान वातावरणातील उकाडा वाढल्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने आठ जणांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याशिवाय आरोग्य विभागाच्या पथकाने दर्शन रांगेतच पंधरा जणांवर उपचार केले आहेत. सहायक जिल्हा शल्यचिकित्सक मंगेश टेहरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोपाल कदम, डॉक्टर नंदकिशोर करवा, डॉक्टर जिरवणकर, डॉक्टर खान, डॉ विठ्ठल रोडगे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे पथक ठीक ठिकाणी थांबवण्यात आले आहे. शहरात भाविकांनी चहा पाणी व भोजन केल्यानंतर रस्त्यावरच कप किंवा प्लेट टाकू नये. यासाठी पालिका प्रशासनाची पथक तैनात आहे. घंटागाड्यांच्या माध्यमातून हा कचरा लगेचच डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात आहे. पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर कर्मचारी पंडीत मस्के यांच्यासह सुमारे दोनशे कर्मचारी या भागात तैनात करत आले आहेत.

भाविकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे - डॉ. मंगेश टेहरे
हिंगोली शहरातील वातावरणामध्ये उकाडा जाणवत आहे. त्यामुळे दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांनी उपाशीपोटी राहू नये. तसेच दर्शनासाठी उशीर लागत असल्याने जास्तीत जास्त पाणी प्यावे. याशिवाय चहा नाश्ता व भोजन देखील घ्यावे. त्यामुळे वातावरणाचा त्रास होणार नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganpati visarjan in hingoli