सिंधुदुर्गावरील ऐतिहासिक गणेशोत्सव

विकास गावकर
Tuesday, 11 September 2018

गणेशोत्सवानिमित्त मान्यवरांनी यापूर्वी व्यक्त केलेली मते पुनर्प्रकाशित करत आहोत. सदर लेख २००९ मधील आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गणेशोत्सवाची सुरवात 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे वारस राजाराम महाराजांनी केली. हा गणेशोत्सव साजरा करण्यामागचा खरा उद्देश होता तो किल्ल्यावर जागता पहारा ठेवणाऱ्या सैनिकांनाही गणेशोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळावी हा. आजही हा उत्सव किल्ल्यावर तेवढ्याच उत्साहाने साजरा होतो आहे. या उत्सवाविषयी....

कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोकणातील लोक उत्सवप्रिय मानले जातात. ऋण काढून सण करण्याचीही इथे परंपरा आहे. एकूणच इथले सर्व सण पाहता त्यातील सर्वात मोठा व महत्त्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव होय. घराघरात साजरा केला जाणारा गणेशोत्सव आता कोकणातही सार्वजनिक स्वरूपात पुढे येतो हे खरे असले तरी अगदी लोकमान्य टिळकांनी पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी म्हणजे 1695 मध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजाराम महाराजांनी सार्वजनिक स्वरूपात गणपती पुजला होता. अर्थात राजाराम महाराज व लोकमान्य टिळक या दोघांचेही उद्देश वेगळे होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीतील जनजागृतीसाठी हुशारीने या उत्सवाचा वापर केला, तर राजाराम महाराजांनी आपल्या ताफ्यातील सैनिकांनाही या उत्सवात सहभागी होता यावे यासाठी हा उत्सव सुरू केला. त्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील उत्सवाला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर हिंदू व मुस्लिम समाजाची 18 घरे आहेत. सध्या किल्ल्यावर 18 पैकी सहा घरांमध्ये गणपती पूजन केले जाते; मात्र या सर्वात सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या मंदिरात बसविल्या जाणाऱ्या गणपतीला ऐतिहासिक महत्त्व आहे. अगदी 16 व्या शतकात हा गणपती बसवला गेला. शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूस हा गणपती बसवला जातो. पाच दिवसांनी त्याचे विसर्जन केले जाते. या काळात मंदिराचे पुजारी त्याची विधिवत पूजा करतात. गेली बरीच वर्षे हा गणपती मालवणमधील वायंगणकर बंधूंच्या मूर्तिशाळेत तयार होतो. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी ही मूर्ती वाजतगाजत किल्ल्यावर नेली जाते. होडीतून मूर्ती नेण्याची प्रथा आजही अबाधित आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे हे भारतातील एकमेव मंदिर आहे आणि या मंदिरातील गणेशोत्सवास वेगळे स्थान आहे; मात्र याच काळात इतरत्रही गणेशोत्सव साजरे होत असल्याने तसा किल्ल्यावरील गणेशोत्सव सध्या दुर्लक्षितच आहे. या दरम्यानच्या काळात किल्ल्यावर पर्यटकांची गर्दीही कमी असते. दरम्यान, हा गणेशोत्सवाची पाच दिवसांनी सांगता केली जाते. ही विसर्जनाची जागाही पूर्वांपार ठरलेली आहे. समुद्रात एक दगड आहे. या दगडाला स्थानिक लोक धरणांचा दगड असे म्हणतात. याच भागात मूर्ती विसर्जन केले जाते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील या सार्वजनिक गणेशाची पूजा सकपाळ कुटुंब करते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेवढ्याच भक्तिभावाने या मूर्तीची पूजा मुस्लिम बांधवही करतात.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील गणेशोत्सवालाही तशीच ऐतिहासिक किनार आहे. त्यामुळेच हा गणेशोत्सव महत्त्वपूर्ण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: History of Ganeshotsav in Kokan