esakal | एकाच घरात 171 गणेशमूर्तींची स्थापना (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

एकाच घरात 171 गणेशमूर्तींची स्थापना (व्हिडिओ)

देश-विदेश आणि भारतातील विविध राज्यातून आणलेल्या शंभरहून अधिक गणेशमूर्तींची अमरावतीत एका गणेशभक्ताने राहत्या घरातच स्थापना केली आहे.

एकाच घरात 171 गणेशमूर्तींची स्थापना (व्हिडिओ)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : देश-विदेश आणि भारतातील विविध राज्यातून आणलेल्या शंभरहून अधिक गणेशमूर्तींची अमरावतीत एका गणेशभक्ताने राहत्या घरातच स्थापना केली आहे. एक नाही, दोन नाही तर तब्बल 171 गणेशमूर्तींची स्थापना आपल्या राहत्या घरातच करून एका गणेशभक्त परिवाराने नवा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनंदिन जीवनातील मनुष्याच्या विविध हावभावांचे हुबेहुब दर्शन घडविणाऱ्या 171 गणेशमूर्तीं या भक्ताकडे उपलब्ध आहेत. निस्सीम गणेशभक्त असलेल्या सुनिता खंडेलवाल आणि राजेश खंडेलवाल असे या गणेशभक्त दांपत्याचे नाव आहे.

अमरावती शहरातील श्रीकृष्ण पेठ परिसरातील राजेश खंडेलवाल यांच्या घरात गणेशाची विविध रूपे दर्शविण्यात आली आहे. गणेशाच्या अवतीभोवती या दांपत्याने सुंदर आरास केली आहे. काही वर्षांपूर्वी या दांपत्याने घरीच एका गणेश मूर्तीची स्थापना केली. पर्यटनानिमित्त देशात फिरताना  विविध राज्यातील  भौगोलीक प्रदेशानुसार तेथे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या गणेश मुर्ती  खरेदी करून दरवर्षी त्या मुर्तींची स्थापना करण्यात येत होती. अशा पद्दतीने दरवर्षी गणेशमुर्तींच्या संख्येत वाढ होत गेली.

स्थापना करण्यात आलेल्या गणेश मुर्तींमध्ये विविध रूपे दर्शविण्यात आली आहे.  नाशिकच्या कुंभ मेळ्यात वामनअवताराच्या वेषात रथावर स्वार झालेली गणेशमुर्ती, पाळण्यात झोपणारी गणेशाची मुर्ती, शेतात कामे झाल्यानंतर बैलगाडीवर आराम करणारी गणेशाची मुद्रा, ओल्या आणि वाळल्या नारळावर कोरलेली गणेशमुर्ती, बाबागाडीत फिरणारा गणेश, सायकल रिक्षातून फिरणारा गणेश, दोन चाकी सायकल चालविणारा गणेश, यासह नवी दिल्ली, बॅंगलोर, जयपुर, गोहाटी, कोलकाता, इंदोर, भोपाळ, मुंबई, पाटणा, रांचीसह काही मुर्ती या विदेशातून आणण्यात आल्या आहेत. या सर्व गणेशमूर्तींमध्ये दरवर्षी वाढ होते.

मूर्ती ठेवण्यासाठी आमच्याकडे एक स्वतंत्र खोली आहे. या खोलीत मूर्ती ठेवून वर्षभर आम्ही सर्व मुर्तींची पुजा करतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत तर या मुर्तींची स्थापना करून दहा दिवस नित्यनियमाने पुजा करण्यात येतेच. शिवाय वर्षभर घरातील एका खोलीत गणेशमुर्तीं ठेवण्यात येऊन पुजा अर्चना करण्यात येते असे राजेश खंडेलवाल यांंनी सांगितले.

खंडेलवाल दांपत्याची गणेशभक्ती बघून त्यांच्या परिवारातील सदस्यांनी आणि सहकारी स्नेही मंडळंनीही अग्रवाल दांपत्याला गणेशमुर्ती भेट दिल्या आहेत. त्यामुळे गणेश मूर्तींच्या संग्रहात दरवर्षी वाढ होत असल्याचे खंडेलवाल यांंनी सांगितले. ही वाढ होत आता तब्बल 171 गणेशमुर्तीचा संग्रह खंडेलवाल यांच्याकडे झाला आहे. हा परिवार दरवर्षी आपल्या घरी एका नवीन देखाव्याच निर्मिती करतात. या वर्षी खंडेलवाल परिवाराने जलकमल हा देखावा साकारला आहे आणि परिसरातील अनेक भाविक यांच्या घरी दर्शनासाठी येतात.