मूर्ती कला बनली रोजगाराचे साधन...

गोपाल हागे
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार यांनी दाखवून दिले अाहे. मूर्त्यांच्या कलात्मक सजावटीतून त्यांनी पंचवीस महिलांना दहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. दरवर्षी नवीन डिझाइन तयार करणे हे त्यांचे वेगळेपण ठरले आहे.

एखादी कला, अावड जर व्यवसायात बदलता अाली तर स्वतःसह इतरांसाठीही रोजगार निर्मिती करण्यास मदतगार ठरते, हे अकोला शहरातील नारायणी पवार यांनी दाखवून दिले अाहे. मूर्त्यांच्या कलात्मक सजावटीतून त्यांनी पंचवीस महिलांना दहा महिने रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. दरवर्षी नवीन डिझाइन तयार करणे हे त्यांचे वेगळेपण ठरले आहे.

नारायणी यांचा स्वप्नील पवार यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर साधारणतः अाठ वर्षांपूर्वी त्यांनी मूर्ती सजावटीच्या कामाला सुरवात केली. पहिल्यावर्षी तीस गणपती मूर्ती विकत अाणून त्यांची सजावट केली. परिसरातील नागरिकांकडून या मूर्त्यांना चांगली मागणी मिळाल्याने त्यांचा उत्साह दुणावला. बीए पर्यंत शिक्षण झालेल्या नारायणी यांना सुरवातीपासूनच सजावटीची विशेष अावड होती. त्यामुळे त्यांनी मूर्ती सजावटीच्या उपक्रमास सुरवात केली. त्यांच्या सजावटीच्या उपक्रमास पती आणि कुटुंबीयांकडून प्रोत्साहन मिळाले अाणि ‘नारायणी अार्टस’ने अाकार घेतला. 

राज्यभर मूर्तींना मागणी  

गणेशोत्सवासाठी लागणारी मूर्ती प्रामुख्याने कोकणातून राज्यभर जाते. परंतु, आता अकोल्यातही दर्जेदार, कलात्मक गणपती मूर्ती निर्मितीचे काम ‘नारायणी’ अार्ट्सच्या माध्यमातून सुरू झाले. नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक, अौरंगाबाद, सोलापूर याचबरोबरीने मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर अादी ठिकाणी ‘नारायणी’ मध्ये सजावट केलेल्या गणपती मूर्त्यांना मागणी वाढत आहे. मागील वर्षांपासून  अासाम राज्यामधील गणेश मंडळे अकोल्यामधून गणेशमूर्ती उत्सवासाठी नेत आहेत.  यावर्षी स्पेशल वाहनाने दोन गणेशमूर्ती अासाममधील गणेश मंडळांमध्ये पोचणार अाहेत. 

विदेशातही मूर्ती, मुखवट्यांना मागणी
नारायणी पवार यांनी सजावट केलेल्या मूर्त्या, मुखवट्यांना राज्य, परराज्याच्या बरोबरीने परदेशातही मागणी मिळाली आहे.  सजावट केलेल्या ६०० गणेशमूर्ती व गौरीचे मुखवटे दरवर्षी मागणीनुसार अमेरिका, दक्षिण अाफ्रिका, इंग्लंड, अादी देशांमध्ये जातात. मुंबई येथून निर्यातदाराच्या माध्यमातून जहाजाद्वारे या मूर्त्या पाठविल्या जातात.  विदेशात पाठविल्या जाणाऱ्या मूर्त्यांची मे महिन्यातच निर्यात होते. गणेश विसर्जन झाले की दाेन महिन्यांची सुटी घेऊन पुन्हा नव्याने गणेश मूर्ती बनवण्याचे काम सुरू हाेते. 

सजावटीत रमले संपुर्ण कुटुंब 

गेल्या काही वर्षांपासून ‘नारायणी’ अार्टसचा कारभार वाढला अाहे. वर्षाला गणपतीच्या किमान चार हजार आणि लक्ष्मीच्या हजारावर मूर्त्यांची सजावट या ठिकाणी केली जाते. हा व्यवसाय वर्षातील दहा महिने सुरू असतो. मूर्ती सजावटीमध्ये पवार कुटुंबातील नारायणी आणि त्यांचे पती स्वप्नील, सासू-सासरे, दीर व त्यांची पत्नी असे सहा जण पूर्णवेळ काम करतात. नारायणी स्वतः मूर्तीचे डिझाईन, सजावट, महिलांना जबाबदारी वाटून देणे अाणि तयार झालेली मूर्ती शेवटी स्वतः पाहून नंतरच ती विक्रीसाठी उपलब्ध करून देणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. त्यांचे पती स्वप्नील हे मूर्ती पॅकिंग, वाहतुकीचे व्यवस्थापन सांभाळतात.  दीर मूर्ती, मुखवटे विक्रीचे नियोजन पहातात.
- नारायणी पवार, ९९२१५५८४७८

मूर्ती निर्मितीत असते वेगळेपण 
 
 नारायणी पवार या डायमंड, मोती, कुंदन वर्क अशा विविध प्रकारचे साहित्य वापरून मूर्तीची सजावट करतात. मूर्ती जितकी मोठी व त्यावर जेवढी सजावट केली असेल त्याप्रमाणे मूर्तीचा दर ठरतो. साधारणपणे ४०० रुपयांपासून मूर्तीच्या किंमती सुरू होतात. सर्वात मोठी मूर्ती किमान ३५ हजारांपर्यंत विकली जाते असे नारायणी यांनी सांगितले. दरवर्षी किमान ७० टक्के मूर्तीचे डिझाइन बदलले जाते. लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती अशा प्रचलित डिझाइन्सच्या तीस मूर्त्या दरवर्षी तयार केल्या जातात. याशिवाय इतर मूर्त्यांचे वेगळ्या पद्धतीने डिझाइन केले जाते. 

अडचणींवर केली मात 

सुंदर, अाकर्षक मूर्ती तयार करण्याबरोबरीने मार्केटिंगही तेवढेच महत्त्वाचे ठरते. मूर्ती विक्रीसाठी नारायणी पवार दरवर्षी नागपूरमध्ये स्टॉल उभारतात. पहिल्यावर्षी नारायणी यांच्या मूर्ती स्टॉलला नागपुरातील विक्रेत्यांनी विरोध केला. कारण नारायणी पवार यांच्या अाकर्षक मूर्त्यांमुळे नागपुरातील विक्रेत्यांवर परिणाम झाला. विक्रेत्यांच्या संघटनेने पवार कुटुंबाला गणेश मूर्ती विकू नका, स्टॉल लावू नका असे सांगत विरोध केला. परंतु, पवार यांनी ग्राहकांच्या अाग्रहाखातर माघार घेतली नाही. अाज नारायणी नियमितपणे नागपुरात स्टॉल उभारून मूर्ती विक्री करतात. दरवर्षी पवार यांच्या मूर्त्यांची विक्री वाढते अाहे. 
 

पंचवीस महिलांना मिळाला रोजगार     
नारायणी अार्टसमध्ये मूर्ती सजावटीचे काम हे वर्षातील दहा महिने सुरू असते. याबाबत नारायणी पवार म्हणाल्या की, मी अमरावती, मंगळूर परिसरातील मूर्तिकारांच्याकडून गणेश मूर्ती, गौरी मुखवटे खरेदी करते.
मूर्त्यांच्या सजावटीसाठी मी पंचवीस महिलांना वर्षभर रोजगार उपलब्ध करून दिला अाहे. हंगाम जसा वेग धरतो तशी मजुरी वाढत जाते. एखादी महिला रोज ४०० ते ५०० रुपयेसुद्धा  कमावते. साधारणपणे दहा महिन्यांचा विचार केला तर एका महिलेला सरासरी २०० रुपये मजुरी मिळते. महिलांना प्रामुख्याने मूर्ती सजावटीचे काम करावे लागते. या कामासाठी महिला अानंदाने होकार देतात. मी या महिलांना मूर्ती सजावटीचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे या महिला कुशलतेने मूर्ती सजावटीचे काम करतात. गणपतीप्रमाणे गौरी, गणेश मुखवटे, दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनासाठी लागणाऱ्या मूर्तींची सजावटीचे काम या ठिकाणी केले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: idol art became means employment