कलेच्या देवतेचा उत्सवी उत्सव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

पुणे : पुण्यातल्या पेठांतला गणपती, मुंबईतला चाळीतला गणपती, तर कोल्हापुरातला आखाड्यातला गणपती आणि लोककला जपणारा मराठवाड्यातला उत्सव, तर विदर्भात उत्सवात उठणाऱ्या भोजनाच्या पक्ती सोबत सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे कलेच्या या देवतेची उपासना ही गणेशोत्सवाची ओळख आजही जपली जाते. 

पुणे : पुण्यातल्या पेठांतला गणपती, मुंबईतला चाळीतला गणपती, तर कोल्हापुरातला आखाड्यातला गणपती आणि लोककला जपणारा मराठवाड्यातला उत्सव, तर विदर्भात उत्सवात उठणाऱ्या भोजनाच्या पक्ती सोबत सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे कलेच्या या देवतेची उपासना ही गणेशोत्सवाची ओळख आजही जपली जाते. 

राज्यभरातील प्रथा 
गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप येऊन सव्वाशे वर्षे होत आली. प्रथा, परंपरा निरनिराळ्या असल्या तरी पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभर हा उत्सव दरवर्षी दिमाखदार पद्धतीने साजरा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवात बाप्पांच्या स्वागतासाठी अनेक पिढ्या झटल्या. सव्वाशे वर्षांनंतरही सार्वजनिक गणेशोत्सवाची जन्मभूमी ठरलेल्या पुण्याने समाजप्रबोधनाचा वसा जपला, तर मायानगरी मुंबईच्या गणेशोत्सवाला काळानुरूप झगमगाटी स्वरूप आले. त्या तुलनेत विदर्भ, मराठवाड्यात पारंपरिक पद्धतीने लोककला, नाटके, बतावण्या यांसारखे कार्यक्रम आजही होतात. कोल्हापूर म्हटले, की पहिलवानांचे शहर ही ओळख. त्यामुळेच मारुतीच्या उपासनेसोबतच बाप्पाची सेवाही मोठ्या भक्तिभावाने आखाड्यांतून होते. कोकणात आजही डोक्‍यावर गणपती मिरवत आणण्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे गौरी-गणपतीत तेथे सामिष भोजनाचाही आस्वाद घ्यायला मिळतो. 

संपूर्ण महाराष्ट्रात फक्त पुण्यातच मानाच्या गणपतींचे प्रथा पाहायला मिळते. मूळचे कोकणातले; परंतु मुंबईत नोकरी- व्यवसायानिमित्त स्थिरावलेले चाकरमानी बालेनृत्य करून गणशोत्सव उत्सव साजरा करतात. मराठवाडा, विदर्भापेक्षा पश्‍चिम महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो. मुंबईतल्या चाळींतल्या गणेशोत्सवाचे प्रमाण कमी झाले असले, तरीही भव्यदिव्य गणेशमूर्तींच्या दर्शनाची ओढ आजही देश-विदेशातील भाविकांना आहेच. 

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक 
गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ म्हणाले, ""वस्तुतः गणेशोत्सव हा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. कारण पूजा साहित्यापासून विविध वस्तू परराज्यांतून महाराष्ट्रात येतात. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशहून हळद-कुंकू, दक्षिणेकडून नारळ, गुजरातहून शाडू आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस, कोकण-मुंबईहून कारागीर, तर मंडपाचे वासे आसामहून, पं. बंगालहून ताडपत्री, पंजाबहून कृत्रिम फुले अशा अनेकविध वस्तू येतात. शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांना या उत्सवात रोजगार मिळतो. गोव्यात उत्सवात देव्हाऱ्यावर रानातल्या फळांचे तोरण बांधतात. तेथे दीड ते पाच दिवसांचे गणपती असतात. साखर-खोबऱ्याच्या नैवेद्याला "नेवरे' म्हणतात. सोलापूरच्या गिरण्या संपुष्टात आल्या; पण तरीही उत्सवाची परंपरा कायम आहे. सर्वधर्मीयांचा सहभाग हे मुंबईतल्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. धार्मिक, आध्यात्मिक परंपरा जोपसणारा पुण्याचा गणेशोत्सवाने जागतिक कीर्ती मिळविली आहे. विदर्भात गौरी-गणपतीला पाहुण्यांची रेलचेल विशेषत्वाने पाहायला मिळते.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Ganeshotsav Pune News Mumbai News Pune Ganpati Mumbai Ganpati