गणेशोत्सवात यंदाही डॉल्बीमुक्तीचे वारे! 

प्रवीण जाधव
Friday, 18 August 2017

सातारा : डॉल्बीमुक्तीचे वारे संपूर्ण परिक्षेत्रात वेगाने वाहात आहे. शहर पोलिसांनीही त्यासाठी कंबर कसून कार्यकर्ते, डॉल्बी चालक-मालकांना डॉल्बीमुक्तीचे आवाहन केले आहे. विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव कोणालाही त्रास न होता शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्‍यक आहे. 

सातारा : डॉल्बीमुक्तीचे वारे संपूर्ण परिक्षेत्रात वेगाने वाहात आहे. शहर पोलिसांनीही त्यासाठी कंबर कसून कार्यकर्ते, डॉल्बी चालक-मालकांना डॉल्बीमुक्तीचे आवाहन केले आहे. विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव कोणालाही त्रास न होता शांततेत पार पाडण्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्‍यक आहे. 

ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासाची सर्वांनाच कल्पना आहे. लहान मुले, गर्भवती स्त्रिया, आजारी व वृद्ध नागरिक यांना त्याचा जास्त फटका बसण्याची शक्‍यता असते. या सर्वांचा विचार करून शासन व न्यायालयाने गेल्या काही वर्षांपासून डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा घातल्या आहेत. पोलिसही त्यासाठी प्रयत्न करत आहेत. ध्वनिप्रदूषणाचा कडक कायदा असूनही अंमलबजावणीअभावी अद्याप त्याचा प्रभाव पुरेसा पडत नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांनी प्रबोधनाबरोबरच कायद्याचा धक्‍का योग्य पद्धतीने दाखवायला सुरवात केल्याने डॉल्बीच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत. 

माजी पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्नांनी पूर्वी 'एक दिवस तुमचा, इतर दिवस आमचे' या भूमिकेतून साताऱ्यात पहिल्यांदा डॉल्बीच्या वापरावर जोरदार प्रहार केला. मिरवणुकीदिवशी रात्री बारानंतर 'बंद' या नियमाचे काटेकोर पालन करायला सुरवात केली. त्यामुळे शहरात पहिल्यांदा 12 वाजता दणदणाट थांबला. तेव्हापासून 12 च्या ठोक्‍याला जिल्ह्यातील डॉल्बीप्रेमींबरोबरच साताऱ्याच्या नागरिकांचे अनंतचतुर्दशीला 12 च्या ठोक्‍याकडे लक्ष असते. 

डॉ. अभिनव देशमुख यांनी तीच भूमिका सुरू ठेवली. 12 च्या ठोक्‍याला दणदणाट बंद. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही तोच कित्ता कायम ठेवला. यंदा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनीही याबाबत विशेष मोहीम राबविली आहे. त्यानुसार जिल्हा पोलिस दलाचे संपूर्ण जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहर पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी डॉल्बी चालक-मालक, गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन डॉल्बी न वाजविण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहा दिवस पोलिसांचे ऐकायचेच, असा त्यांचा आग्रह आहे. 

पोलिसांची ही भूमिका शहरातील सर्वांच्याच दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदाच होणार आहे. डॉल्बीच्या दणदणाटामुळे भिंत पडून गेलेला जीव सातारकरांनी पाहिलेला आहे. त्यामुळे वृद्ध, गर्भवती महिला, लहान मुले यांच्यावर ध्वनिप्रदूषणाने होणारे दुष्परिणाम टाळता येणार आहेत. सातारकरांची सुरक्षितता ही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे पोलिसांच्या या आवाहनला प्रतिसाद देत डॉल्बी टाळून पारंपरिक वाद्यांचा वापर कार्यकर्त्यांनी मिरवणुकीमध्ये करणे आवश्‍यक आहे. कार्यकर्ते तो करतायत, हे नुकत्याच झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या ढोल पथकांच्या वापराने दिसून आला आहे. गणेशोत्सवात तो शत-प्रतिशत व्हावा, एवढीच अपेक्षा आहे. 

चांगले उपक्रम राबवूया! 
ध्वनिप्रदूषण कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याबाबत उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. मागील वर्षी जिल्ह्यातील सर्व मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा केला. यंदाही तशाच सहकार्याची अपेक्षा आहे. डॉल्बी नसल्यास उत्सवात महिलांचा सहभागही वाढतो. तसेच बचत होणारा खर्च नावीन्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रमात राबवून जिल्ह्यातून एक चांगला संदेश संपूर्ण राज्याला देऊया, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Ganeshotsav Satara News Ganpati Festival