पुणे - सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलिंग) आकार असे ४ रुपये ५५ पैसे वीजदर महावितरणने निश्चित केला आहे. त्यामुळे मंडळानी अधिकृतपणे तात्पुरती वीज जोडणी घ्यावी, असे आवाहनही महावितरणने केले.

विघ्नहर्ता श्रीगणेशांचा सार्वजनिक उत्सवाला दोन सप्टेंबर रोजी सुरवात होत आहे. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महावितरणकडून अधिकृतपणे तात्पुरती वीजजोडणी महावितरणकडून देण्यात येते. घरगुती व वाणिज्यिक किंवा इतर वर्गवारीमध्ये वीजवापराच्या स्लॅबनुसार वीजदर निश्चित केले आहे. मात्र सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येणार आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे यासाठी वीजदर महावितरणकडून कमी ठेवले आहेत.
हजारो भाविक देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा ठिकाणी वीजवहन यंत्रणा व्यवस्थित आणि वीजअपघाताचा धोका टाळणारी आवश्यक आहे. मंडप, रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी विद्युत संचमांडणी ही परवानाधारक कंत्राटदारांकडून करून घ्यावी. काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी अहवाल घ्यावा. इलेक्ट्रिक मीटर व इतर स्विचगीअर्स लावलेली जागा देखभालीसाठी मोकळी ठेवावी. तसेच मीटर व स्विचगीअर्सवर पाणी गळणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. महावितरणकडून मंजूर जोडभार संचमांडणीत जोडावा. तसेच आवश्यक त्या ठिकाणी धोक्याची सूचना देणारा फलक लावावेत. तातडीच्या मदतीसाठी महावितरणच्या २४ तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांक १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ यावर संपर्क साधावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे.