esakal | जिवंत देखावे बनले गणेशोत्सवाचा नवा ट्रेंड 
sakal

बोलून बातमी शोधा

जिवंत देखावे बनले गणेशोत्सवाचा नवा ट्रेंड 

जिवंत देखावे बनले गणेशोत्सवाचा नवा ट्रेंड 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे -गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी गर्दी जमते अन्‌ सुरू होतो नाट्याविष्कार...कलाकार जिवंत देखाव्यातून आपले अभिनय कौशल्य सादर करतात अन्‌ या थेट सादरीकरणाला गणेशभक्तांची दिलखुलास दाद मिळते... दरवर्षीप्रमाणे यंदाही हौशी आणि अनुभवी कलाकारांनी सादर केलेल्या जिवंत देखाव्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक मंडळांनी यवर्षीही जिवंत देखाव्यांच्या सादरीकरणावर भर दिला आहे. त्यातून अनेक पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक विषय हाताळले जात आहेत. या जिवंत देखाव्यांच्या सादरीकरणातून कलाकारांचेही अर्थार्जन होत आहे. वैविध्यपूर्ण मांडणी आणि विषय असणारे हे जिवंत देखावे पुण्यातील गणेशोत्सवाचा नवा ट्रेंड बनत आहेत. 

सायंकाळचे सहा वाजले की, हा अनोखा नाट्याविष्कार सुरू होतो. या देखाव्यांमध्ये ऐतिहासिक आणि सामाजिक भान जागविणाऱ्या विषयांवर भर देण्यात येत आहे. कुठे भ्रष्टाचारावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे, तर कुठे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा उलगडणारा देखावा साकारला आहे. कुठे सीमेवर लढणाऱ्या जवांनाचे शौर्य उलगडले जात आहे, तर कुठे बाललैंगिक शोषणाचा गंभीर विषय बोलका होत आहे. हा नाट्याविष्कार सादर करताना एक वेगळाच अनुभव, रसिकांची उत्स्फूर्त दाद आणि आनंद मिळत असल्याची भावना कलाकार व्यक्त करतात. 

अनुभवानुसार मानधन 
जिवंत देखाव्यामध्ये कलाकारांची संख्या 10 ते 30 जण अशी असते. कलाकारांना त्यांच्या अनुभवानुसार मानधन दिले जाते. हौशी कलाकारांना एका दिवसाचे 300 ते 500 रुपये तर अनुभवी कलाकारांना 700 ते दीड हजार रुपये मिळतात. सायंकाळी सातला देखाव्याला सुरवात होते, तर ते रात्री दहापर्यंत दाखवले जाते. हे देखावे साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांचे असतात. या देखाव्यांमध्ये विविध क्षेत्रांतील कलाकार काम करतात. महाविद्यालयीन तरुणांसह गृहिणीही त्यात सहभागी होत आहेत. काहीजण हौसेने देखाव्यात सहभागी होत असून, त्यासाठी ते मानधन घेत नाहीत. देखाव्यात सहभागी होणारा वयोगट 15 ते 60 वर्षांचा आहे. 

मंडळांचे खास बजेट 
जिवंत देखाव्यासाठी मंडळांनी खास बजेट तयार केले आहे. ऐतिहासिक देखाव्यासाठी सुमारे एक लाख रुपये, तर सामाजिक विषयांवरील देखाव्यासाठी एक ते दीड लाख रुपये इतका बजेट मंडळांनी तयार केले आहे. त्यात नेपथ्य, संगीत, कलाकारांचे मानधन अशा गोष्टींचा समावेश आहे. काही नाट्यसंस्थांमध्ये या सर्व देखाव्यांचे नियोजन केले जात आहे. मंडळातील हौशी कलाकारांनी एकत्र येऊन देखावा सादर केला आहे. 

वैविध्यपूर्ण विषयांची मांदियाळी 
झाशीची राणी लक्ष्मीबाई ते सावित्रीबाई फुले....छत्रपती संभाजी महाराज ते लोकमान्य टिळक या दिग्गज महापुरुषांवर आधारित ऐतिहासिक देखाव्यांसह पौराणिक विषयही देखाव्यांमध्ये हाताळण्यात येत आहेत. शिवाय सोशल मीडिया ऍडिक्‍शनपासून ते भ्रष्टाचार...बॅंकेतील ऑनलाइन चोरी...स्त्री अत्याचार असो वा मराठी शाळा बंद पडण्याचा विषय...असे सामाजिक विषय देखाव्यांमधून लोकांसमोर मांडले जात आहेत. 

""मी देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. प्रेक्षकांसमोर थेट (लाइव्ह) कला सादर करण्यात कलाकारांना वेगळा आनंद आणि अनुभव मिळतो. आपल्या कलेला प्रेक्षकांची दिलखुलास दादही मिळते. हा अनुभव वेगळाच असतो. 
- किरण घोलप, कलाकार 

""पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील देखाव्यांची संख्या अधिक आहे. काही हौशी कलाकारांनी देखावे सादर केले आहेत. हा उत्सवाचा बदलता ट्रेंड असून, मंडळांनी सुचविलेल्या विषयानुसार संहिता लेखन आणि नेपथ्यासह हा देखावा उभारला आहे. सामाजिक प्रबोधनासाठी जिवंत देखावे चांगले माध्यम ठरत असून, ऐतिहासिक विषयही यात हाताळले जात आहेत. मी गेल्या नऊ वर्षांपासून जिवंत देखाव्यासाठी काम करत आहे. या माध्यमातून लोकभान जागविण्यास मदत होत आहे.'' 
- राजेंद्र पालवे, कलाकार व दिग्दर्शक 

""मी अनेक वर्षांपासून कलेच्या क्षेत्रात काम करत आहे. तसेच, जिवंत देखाव्यांच्या दिग्दर्शनापासून ते कलाकारांच्या अभिनयापर्यंत...विविध माध्यम मी हाताळत आहे. यंदा "सुराज्याच्या शोधात' हा शिवरायावर आधारित ऐतिहासिक देखावा साकारला आहे. सध्या देखाव्यांचा ट्रेंड बदलत आहे. अनेक मंडळे जिवंत देखाव्यातून सामाजिक विषय हाताळत आहेत. देखाव्यांचे रोज किमान दहा ते बारा प्रयोग होतात. गणेशोत्सवात हजारो लोकांसमोर कला सादर करण्यासाठी दोन महिन्यांपासून तयारी करावी लागते. 
- राहुल भालेराव, दिग्दर्शक