विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासुन पर्यावरण पूरक गणेशमूर्ती केल्या तयार

रमेश मोरे
Monday, 21 August 2017

अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर मराठी/ इंग्लिश मीडियममध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत साडेसहाशे विद्यार्थी-विद्यार्थीनिंनी सहभाग घेत सुबक गणेशमुर्ती साकारल्या. या मूर्तिंना नैसर्गिक रंग देण्यात येणार आहेत. या आकर्षक मूर्तीमधून एकीची निवड करून शालेय गणेशोत्सवात तिची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी दिली.

पुणे : पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा नुसता संदेश न देता प्रदूषण रोखण्याच्या परिवर्तनाची वेगळी चळवळ जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटी तर्फे हाती घेण्यात आली आहे. पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींची निर्मिती विद्यार्थ्यांनी स्वतः करुन त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आपापल्या घरी करावी, यासाठी सोसायटीने पुढाकार घेतला आहे.

अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर मराठी/ इंग्लिश मीडियममध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत साडेसहाशे विद्यार्थी-विद्यार्थीनिंनी सहभाग घेत सुबक गणेशमुर्ती साकारल्या. या मूर्तिंना नैसर्गिक रंग देण्यात येणार आहेत. या आकर्षक मूर्तीमधून एकीची निवड करून शालेय गणेशोत्सवात तिची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनी दिली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष प्रणव राव,  मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील उपस्थित होते.

शाळेचे चित्रकला शिक्षक कमलेश गावंड, भटू शिंदे, योगेश जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्याना शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. 

याबाबत आरती राव यांनी सांगितले, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन होत नसल्याने या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखणे, प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर कमी करुन शाडूच्या मातीचा वापर वाढविणे, मुलांमधील कलागुणांना वाव देणे, असे अनेक उद्देश या उपक्रमातून एकाच वेळेस साध्य करण्याचा प्रयत्न आहे. तसेच निर्माल्य नदीत न  टाकता या निर्माल्याचे खत कसे बनवावे, याची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन न करता हौदात किंवा घरी टबमध्ये विसर्जन करावे, असे आवाहनही आरती राव यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रदूषण रोखण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तीची निर्मिती व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांमार्फत समाजात संदेश पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शाडू मातीच्या मूर्तींना नैसर्गिक रंग देऊन विद्यार्थी आपापल्या घरात या मूर्तिंची स्थापना करणार आहेत, असेही आरती राव म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news ganesh statue sangvi