"महागणपतीम्‌'साठी तरुण कलावंतांची एकी!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 August 2017

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नवनवी गाणी बाजारात येण्यास सुरवात झाली आहे; पण काही गाणी थेट "सोशल मीडिया'च्या माध्यमातून श्रोत्यांसमोर आणली जात आहेत. त्यापैकीच एक गाणे "महागणपतीम्‌

पुणे - वेगवेगळ्या गायक-वादकांसोबत जोडले गेलेले, वेगवेगळ्या मैफलीत गायन-वादन करणारे नव्या पिढीतील कलावंत "काहीतरी वेगळे करायचे' हा हेतू समोर ठेवून एकत्र येतात आणि एक सुरेल कलाकृती आकाराला आणतात. पुढच्या काही तासांतच ही कलाकृती "सोशल मीडिया'वर चर्चेचा विषय बनते. तिची दखल गायक-संगीतकार शंकर महादेवन, राहुल देशपांडे यांच्यापासून अनेक नामवंत कलावंत घेतात.

हे सगळे शक्‍य झाले ते संगीताची पूजा करणारे नव्या पिढीतील काही कलावंत एकत्रित आल्यामुळे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नवनवी गाणी बाजारात येण्यास सुरवात झाली आहे; पण काही गाणी थेट "सोशल मीडिया'च्या माध्यमातून श्रोत्यांसमोर आणली जात आहेत. त्यापैकीच एक गाणे "महागणपतीम्‌'. पुण्यातील काही कलावंतांनी तयार केलेले हे चारच मिनिटांचे गाणे सध्या चर्चेचा विषय बनले आहे. त्यासाठी संगीतकार, सरोदवादक सारंग कुलकर्णी, गायिका प्रियांका बर्वे, गायिका सानिका कुलकर्णी यांच्याबरोबरच आशय कुलकर्णी (तालवाद्य), अमित गाडगीळ (बेस गिटार), सौरभ भालेराव (की-बोर्ड), भूषण चिटणीस (इलेक्‍ट्रिक गिटार) हे नव्या पिढीतील गायक-वादक एकत्र आले आहेत.

गाताना किंवा वादन करताना आपल्याला स्वातंत्र्य नसते. संगीतकार सांगतात त्याप्रमाणे आपण गायन-वादन करत असतो; पण यापुढे जाऊन आणि पैशांचा विचार न करता आपल्याला आणखी काहीतरी "क्रिएटिव्ह' करायचे असते, हवे ते गायचे असते. ते अशा पद्धतीच्या प्रयोगातून शक्‍य होते. त्यामुळे असे प्रयोग आम्ही एकत्र येऊन सतत करत राहणार आहोत.
- प्रियांका बर्वे (गायिका)

"महागणपतीम्‌' हा जवळपास दोनशे वर्षांपूर्वीचा संस्कृत श्‍लोक आहे. तो आम्ही जोग रागात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पद्धतीने सादर केला आहे. रॅप, पॉप असे वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आम्ही ऐकत असतो. ते आपल्या संगीतातून कसे व्यक्त होऊ शकते, याचा अशा प्रकारच्या प्रयोगातून आम्ही विचार करतो.
- सारंग कुलकर्णी (सरोदवादक)

"सोशल मीडिया'वरील यंदाची इतर काही गाणी
- गणाध्यक्ष पहिला...
- मोरया, तुझ्या नामाचा गजर...
- ओंकारा तव रूप...
- गणपती तेरी जय जय...
- पार्वतीच्या बाळा गणपती...
- सुखकर्ता तू...
- चिंतामणी आगमन...
- जीव जडला चरणी तुझ्या रे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news music ganesh festival