Ganeshotasav 2022: आपल्या लाडक्या बाप्पासाठी बनवा खास सुग्रास मोदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2022 modak

Ganeshotasav 2022: आपल्या लाडक्या बाप्पासाठी बनवा खास सुग्रास मोदक

असे म्हणतात की मोदक हा श्री गणेशाचा सर्वात आवडता पदार्थ आहे. गणेश चतुर्थीला तुम्ही आराध्यांना प्रसन्न करण्यासाठी मोदकाचा नैवेद्य देऊ शकता. गणेशोत्सवाच्या खास दिवसांसाठी जर तुम्हाला एकदंताला मोदक अर्पण करायचे असतील तर आम्ही तुम्हाला ते बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आम्ही दिलेल्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही सहज मोदक तयार करू शकता.

दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात रिद्धी-सिद्धी देणाऱ्याची विशेष पूजा केली जाते. तसे, या दहा दिवसांत तुम्ही कधीही मोदकांचा नैवेद्य वाढवू शकता. चला जाणून घेऊया मोदक भोग बनवण्याची सोपी पद्धत.

हेही वाचा: Mava Modak: कमी साहित्यात, अगदी कमी वेळात आणि झटपट तयार मावा मोदक कसे करायचे?

उकडीचे मोदक कसे वळायचे-

उकडीसाठी साहित्य :

४ वाट्या तांदुळाची पिठी

३ वाट्या पाणी

१ पळी तेल

१ लहान चमचा साजूक तूप

चवीपुरते मीठ

सारण :

१ वाटी ओलं खोबरं

पाऊण वाटी चिरलेला गूळ

हे दोन्ही एकत्र करून शिजवून घेणे.

हेही वाचा: Ganeshotsav 2022: ड्रायफ्रुट्स मोदक कसे तयार करायचे?

उकड काढण्याची कृती:

प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदुळाची पिठी घाला. नीट ढवळून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ आणायची. (काळजी म्हणून वाफ येण्यासाठी जी झाकणी/ताटली ठेवली असेल तिच्यावर साधे/थंड पाणी घाला म्हणजे उकड खाली जळणार नाही.) थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्यायची.

मोदक करण्याची कृती:

१. उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मधे घोळवून घ्या.

२. या गोळ्याची वाटी बनवा.

३. दोन्ही हातांचा वापर करून वाटी आणखी खोलगट करा. यासाठी अंगठा आत आणि बाकी सर्व बोटे बाहेरच्या बाजूने घेत दोन्ही हाताने वाटीला गोल आकार देत खोल करायचे आहे.

४. या वाटीमधे मग एक ते दीड चमचा सारण भरा.

५. आता वाटीला एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हाताची ३ बोटे (अंगठा, अंगठ्याच्या बाजूचे index finger आणि मधले बोट) वापरून पाकळ्या काढायच्या आहेत. यात index finger वाटीच्या आत आधाराला व अंगठा आणि मधल्या बोटाची सरळ चिमटी करून वाटीच्या खालपासून पाकळी काढावी.

६. एक एक करत सर्व पाकळ्या काढाव्या. जितक्या जवळ आणि सारख्या अंतराने असतील तितका मोदक नंतर चांगला दिसेल.

७. मग मोदक तळव्यावरच ठेवून दुसर्‍या हाताने पाकळ्या जवळ घेत घेत मोदक बंद करत जावा.

८. मोदक पूर्ण बंद करून वर टोक काढायचे आणि एक एक पाकळी चिमटीत धरून तिला आणखी शेप द्यायचा ज्यामुळे मोदक अधिक उठावदार दिसतील.

या नंतर मोदकपात्रात पाणी घालून ते गरम करायचे. जाळीवर हळदीची/केळीची पाने घालून (त्याने मोदक खाली चिकटणार नाहीत.) त्यावर मोदक ठेवून पंधरा मिनिटे वाफवायचे. झाले मोदक तयार.

Web Title: Ganeshotasav 2022 Make Ganesha Sugras Modak For Your Beloved Bappa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..