
Ganeshotsav 2022: मिल्क पावडरपासून बनवा घरच्या घरी फक्त 15 मिनिटात चवदार पेढा
आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरच्या घरी पेढा कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत.
सणासुदीचे दिवस सुरू झाले की आपोआप मिठाई पेढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ सुरू होते.आणि अशा भेसळयुक्त मिठाई जर का आपण सेवन केल्या तर त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. म्हणून सणासुदीच्या काळात घरच्या घरीच मिठाई पेढा तयार करावा.
साहित्य
1) एक वाटी मिल्क पावडर
2) पाव वाटी तूप
3) अर्धी वाटी दूध
4) पाव वाटी साखर
5) वेलची पूड
कृती
पेढा तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक कढई गॅसवर तापायला ठेवावी. कढई तापली की त्यात तूप टाकावे. तूप गरम झालं की त्यात मिल्क पावडर टाकावी.
तूप खूप जास्त कडक होऊ देऊ नये, तसेच गॅस खूप मोठा किंवा मध्यमही ठेवू नये. पेढ्याची ही रेसिपी करताना गॅस मंद ठेवावा. कारण मिल्क पावडर लगेचच करपून जाण्याची शक्यता असते.
अगदी मंद आचेवर मिल्क पावडर परतून घ्यावी. तिचा रंग हलकासा तपकिरी म्हणजेच गोल्डन ब्राऊन झाला की त्यात दूध टाकावे. सामान्य तापमानावरचं किंवा मग कोमट केलेलं दूध टाकावे.
मिल्क पावडर अगदी पांढरट दिसत असतानाच दूध टाकू नका. तिचा रंग बदलू द्या, नाहीतर पेढे चवदार होणार नाहीत.
दूध टाकल्यावर मिल्क पावडर आणि दूध हे मिश्रण एकत्र होऊन आटून येईल. ते आटून थोडं घट्ट झालं की मग त्यात साखर टाकावी. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी- जास्त करू शकता.
साखर टाकल्यावर मिश्रण पुन्हा थोडं पातळ होईल, पण हळू हळू घट्ट होत जाईल. घट्ट झालं की गॅस बंद करावा. मिश्रण थंड झालं की त्याचे आवडीनुसार आकार करून पेढे करावेत.