
मोदक गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ. विविध प्रकारचे मोदक बाजारात उपलब्ध असतातच, पण असेच जरा हटके मोदक घरीच करता आले, तर त्यातला गोडवा आणखी वाढतो... बाप्पासाठी अशाच काही निवडक मोदकांच्या रेसिपीज...
अननस मोदक
साहित्य : सारणासाठी : तीन कप ओला खोवलेला नारळ, १ कप दूध, १ कप साखर, १ कप अननसाचे तुकडे, १ चिमूट पिवळा रंग, २-३ थेंब अननस ईसेन्स, ड्राय फ्रुट्सचे तुकडे
आवरणासाठी : दोन कप तांदळाचे पीठ, २ टीस्पून मैदा, २ टीस्पून तूप, २ कप पाणी, मीठ चवीनुसार
कृती : खोवलेला नारळ, दूध, साखर, मिक्स करून घट्ट होऊपर्यंत शिजवून घ्यावे. त्यामध्ये पिवळा रंग, अननसाचे तुकडे, अननसाचा ईसेन्स व ड्राय फ्रुट्सचे तुकडे घालून मिक्स करून बाजूला ठेवावे.
एका कढईमध्ये २ कप पाणी गरम करून त्यामध्ये मीठ व तेल घालून पाण्याला चांगली उकळी आणावी. मग त्यामध्ये तांदळाचे पीठ व मैदा घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर एक वाफ येवू द्यावी. उकड आणलेले पीठ परातीत काढून घेवून ओल्या हाताने चांगले मळून घ्यावे व त्याचे एकसारखे २१ लिंबाएवढे गोळे करून हातावर पुरीसारखे थापून त्यामध्ये १ चमचा नारळाचे मिश्रण भरून पुरी बंद करावी व त्याला मोदकाचा आकार द्यावा. मोदक पात्रामध्ये २ ग्लास पाणी घालून चांगले गरम करून घ्यावे. पाणी गरम झाल्यावर त्यावर चाळणी ठेवून चाळणीवर केळीचे पान ठेवून, चाळणीमध्ये जेवढे मोदक बसतील तेवढे ठेवावे, वरतून परत केळीचे पान ठेवावे व मोदक पात्र बंद करून १०-१२ मिनिटे मोदकाला उकड आणावी. जोपर्यंत मोदकाला उकड येत आहे तो पर्यंत बाकीचे मोदक करून घ्यावे व त्यांना उकड आणावी. गरम-गरम मोदक वरतून साजूक तूप घालून सर्व्ह करावे.
काजू मोदक
साहित्य : दोन कप खवा, १ कप काजू, १ किंवा अर्धा कप साखर (पिठीसाखर करून), १ टीस्पून वेलचीपूड, पाव कप दूध
कृती : काजू दुधामध्ये एक तास भिजत ठेवावे. मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. कढईमध्ये खवा मंद विस्तवावर थोडासा भाजून घ्यावा व त्यामध्ये काजू पेस्ट व पिठीसाखर घालून थोडे घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे. घट्ट झाल्यावर विस्तव बंद करून खव्याचे मिश्रण थंड करायला ठेवावे. खव्याचे मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करून मळून घ्यावे. मिश्रणाचे एकसारखे २० गोळे करून मोदकाचा आकार द्यावा. झाले मोदक तयार.
गाजर मोदक :
साहित्य : सारणासाठी : अडिचशे ग्रॅम केशरी गाजरे (कोवळी), अर्धा कप दूध, पाव कप खवा, पाव कप साखर, पाव टीस्पून वेलचीपूड, थोडा सुकामेवा
आवरणासाठी : एक कप तांदळाचे पीठ, १ कप पाणी, १ टीस्पून मैदा, १ टीस्पून तूप, मीठ चवीनुसार
सारणाची कृती : गाजरे स्वच्छ धुऊन, सोलून किसून घ्यावीत. एका कढईत किसलेले गाजर, दूध व साखर मिक्स करून थोडे घट्ट होऊपर्यंत आटवून घ्यावे. त्यामध्ये खवा घालून मिक्स करून २ मिनिटे परत गरम करून घ्यावा. नंतर त्यामध्ये वेलची पूड व सुक्यामेव्याचे तुकडे घालून मिश्रण तयार करावे.
आवरणासाठी : एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये मीठ व तेल घालून, पाण्याला उकळी आणावी. त्यामध्ये तांदळाचे पीठ व मैदा मिक्स करून हलवून भांड्यावर झाकण ठेवावे व २ मिनिटे त्याला वाफ येवू द्यावी. नंतर शिजलेले पीठ परातीत काढून घेऊन ओल्या हाताने चांगले मळून घ्यावे. त्याचे लिंबा एवढे गोळे करून हातावर पुरीसारखे थापून त्यामध्ये एक चमचा मिश्रण ठेवून पुरी बंद करावी व त्याला मोदकाचा आकार द्यावा. असे सर्व मोदक तयार करून घ्यावे. मोदक पात्रात पाणी गरम करून घ्यावे. मोदक पात्राच्या चाळणीवर एक केळीचे पान ठेवून त्यावर पाणी शिंपडून सर्व मोदक लावून घ्यावे. परत मोदकावरती एक केळीचे पान ठेवून मोदक पात्राचे झाकण घट्ट लावून १५ मिनिटे मोदक उकडून घ्यावे. गरम गरम मोदक साजूक तूप घालून सर्व्ह करावे.
गुलकंद मोदक
साहित्य : सारणासाठी : एक मध्यम आकाराचा नारळ, २ कप दूध, पाऊण कप साखर,२ टेबलस्पून गुलकंद, १ टीस्पून वेलची पावडर, ५-६ काजू व ५-६ बदाम (तुकडे करून)
पारीसाठी : दोन कप रवा (बारीक), १ टेबलस्पून तूप (मोहनसाठी), मीठ चवीनुसार, अर्धा कप दूध व लागेल तसे पाणी, मोदक तळायला तूप
कृती : नारळ खोवून घ्यावा, त्यामध्ये साखर व दूध मिक्स करून शिजवायला ठेवावे. मिश्रण घट्ट होऊपर्यंत शिजवावे. त्यामध्ये वेलची पावडर, गुलकंद, काजू, बदाम घालून मिक्स करावे. बारीक रवा मिक्सरमध्ये थोडा ग्राईंड करून घ्यावा. मग त्यामध्ये मीठ व कडकडीत तुपाचे मोहन घालून मिक्स करावे. दूध व पाणी मिक्स करून रवा थोडासा सैलसर भिजवावा (खूप सैल झाला तर मोदक खूप तुपकट होतील). रवा भिजवल्यावर १० मिनिटे झाकून बाजूला ठेवावा. नंतर भिजवलेल्या रव्याचे एकसारखे मोठ्या लिंबा एवढे गोळे करावे. एक-एक गोळा पुरीसारखा लाटून त्यामध्ये एक टेबलस्पून सारण भरून गोळा बंद करावा. आपल्याला पाहिजे तो आकार द्यावा.
कढईमध्ये तूप गरम करून विविध आकाराचे मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. वरतून पिठी साखर भूर-भूरावी.
टीप : रवा वापरून मोदक करायचे असतील, तेव्हा गोळे पुरीसारखे लाटून सारण भरून मोदक बंद केले की मोदक ओल्या कापडामध्ये ठेवावे म्हणजे सुकणार नाहीत व तळताना उघडणार नाही. मोदक करताना गोळा लाटून झाला, की सारण भरल्यावर पुरीला कडेनी अगदी थोडेसे दूध लावावे, मग मोदक बंद करावे म्हणजे ते चांगले चिटकून राहतील.
चीज-स्वीट कॉर्न मोदक
साहित्य : सारणासाठी : दोन कप स्वीट कॉर्नचे दाणे, २ चीज क्युब (किसून), १ टेबलस्पून आले-लसून पेस्ट, ३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून) १ टेबलस्पून लिंबू रस, १ टेबलस्पून पुदिना पाने (बारीक चिरून), १ टेबलस्पून बटर, मीठ चवीनुसार
पारीसाठी : एक कप मैदा, १ कप गव्हाचे पीठ, १ टेबलस्पून गरम तेल, अर्धा टीस्पून मिरे पावडर, मीठ चवीनुसार, १ चिमट खायचा सोडा, तळण्यासाठी तेल
कृती : मैदा, गव्हाचे पीठ, तेलाचे मोहन, मिरे पावडर, मीठ व खायचा सोडा मिक्स करून थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्यावे व १०– १५ मिनिटांनी त्याचे छोटे गोळे करावे. स्वीट कॉर्नचे दाणे थोडे शिजवून घ्यावे व थोडेसे ठेचून घ्या. एका कढाईमध्ये बटर घालून आले-लसून पेस्ट, मिरचीचे तुकडे घालून परतून घ्यावे. त्यामध्ये ठेचलेले कॉर्नचे दाणे, लिंबू रस, पुदिना पाने, मीठ घालून थोडे परतून घेऊन त्यामध्ये किसलेले चीज मिक्स केल्यावर झाले सारण तयार. पीठाच्या छोट्या गोळ्याची पुरी लाटून त्यामध्ये एक चमचा मिश्रण भरून पुरी बंद करावी व हवा तसा पुरीला आकार द्यावा व तळून घ्यावे.
चॉकलेट मोदक
साहित्य : अडिचशे ग्रॅम चॉकलेट डार्क बेस, २५० ग्रॅम मिल्क बेस अथवा व्हाईट बेस, ड्रायफ्रुट्सचे तुकडे, मोदकाच्या आकाराचा मोल्ड
कृती : चॉकलेट डार्क बेस, मिल्क बेस व व्हाईट बेस घेवून तीनही वेगवेगळे डबल बाँयलिंग पद्धतीने विरघळवून घ्यावे. नंतर एका चमच्याने हलवून घ्यावे. त्यामध्ये ड्रायफ्रुट्सचे तुकडे मिक्स करून ५ मिनिटे थंड करायला बाजूला ठेवावा. नंतर मोदकाचा मोल्ड घेऊन मोल्डमध्ये प्रथम डार्क बेस, मग व्हाईट बेस असे घालावे. मग मोल्ड फ्रीझमध्ये ५ मिनिटे ठेवून मग काढावा.
पनीर उकडी मोदक
साहित्य : सारणासाठी : दोन कप पनीरचे बारीक तुकडे, १ छोटा कांदा, अर्धा टेबलस्पून आले-लसून पेस्ट, २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), पाव कप कोथिंबीर (चिरून), मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लिंबू रस
आवरणासाठी : दोन कप तांदळाचे पीठ (आंबेमोहर), २ कप पाणी, २ टेबलस्पून तेल, २ टेबलस्पून मैदा, मीठ चवीनुसार
कृती : एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, कांदा, आले-लसूण व हिरवी मिरची घालून थोडे परतून घ्यावे. त्यामध्ये मीठ, पनीरचे तुकडे, कोथिंबीर व लिंबू रस घालून मिश्रण मिक्स करून घ्यावे. पातेल्यात २ कप पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये मीठ व तेल घालावे. नंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ व मैदा घालून मिक्स करून त्यावर झाकण ठेवावे. चांगली वाफ आल्यावर पीठ परातीत काढून थंड पाण्याचा वापर करून पीठ खूप मळून घ्यावे. नंतर त्याचे लिंबाएवढे गोळे करून हातावर थापून त्याची पुरी करावी व त्यामध्ये एक टेबलस्पून मिश्रण भरावे. पुरी बंद करून मोदकाचा आकार द्यावा. असे सर्व मोदक करून घ्यावे. मोदक पात्रामध्ये पाणी चांगले गरम करून त्यावरती चाळणी ठेवून त्यात केळीचे पान ठेवा. पानावर जेवढे मोदक बसतील तेवढे ठेवून वरती परत केळीचे पान ठेवावे. मोदक पात्राचे झाकण लावून घ्यावे. १०-१२ मिनिटे मोदक उकडून घ्यावे. गरम गरम छान लागतात.
बुंदी मोदक
साहित्य : दोन कप खोवलेला ओला नारळ, २ बुंदीचे लाडू, १ कप दूध, अर्धा कप साखर, अर्धा टीस्पून वेलची पावडर, २ टेबलस्पून ड्राय फ्रुट्स
कृती : खोवलेला नारळ, दूध, साखर मिक्स करून घट्ट होऊपर्यंत शिजवून घ्यावे. त्यामध्ये बुंदी, वेलचीपूड, ड्राय फ्रुट्स घालून मिक्स करून २-३ मिनिटे परत शिजवून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गोळे करून त्याला मोदकाचा आकार द्यावा.
कोथिंबीर मोदक
साहित्य
भरण्यासाठी : एक कोथिंबीरीची छोटी जुडी, १ कप खोवलेला नारळ, १ टीस्पून आले (बारीक चिरून), १ टीस्पून लसून (बारीक चिरून), ३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १ टीस्पून खसखस (भाजून), अर्धा टीस्पून गरम मसाला, मीठ चवीनुसार
पारीसाठी : दोन कप मैदा, १ टेबलस्पून गरम तेल, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून धने-जिरे पावडर, २ टेबलस्पून दूध, मीठ चवीनुसार, मोदक तळण्यासाठी तेल
कृती : कोथिंबीर धुऊन बारीक चिरून घ्यावी. नंतर त्यामध्ये खोवलेला नारळ, आले, लसून, मिरची, खसखस भाजून, गरम मसाला व मीठ घालून मिश्रण तयार करावे. एका परातीत मैदा, तेलाचे कडकडीत मोहन, हळद, धने-जिरे पावडर, २ टेबलस्पून दूध व मीठ घालून पीठ चांगले घट्ट माळून घ्यावे. १० मिनिटांनी त्याचे लहान गोळे करून पुरी लाटून त्यामध्ये १ टेबलस्पून मिश्रण ठेवून पुरी बंद करावी व त्याला मोदकाचा आकार द्यावा. कढईमध्ये तेल गरम करून मोदक गुलाबी रंगावर मंद विस्तवावर तळून घ्यावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.