esakal | गणेशोत्सव जोशात साजरा करा; पण न्यायालयाचे आदेश पाळूनच
sakal

बोलून बातमी शोधा

Dhol-Tasha

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नियम
एका पथकात ४० ढोल, १० ताशे व सहा झांज हीच वाद्ये असावीत
वादक व सभोवताली कडे करणारे १०० पेक्षा जास्त असू नयेत
पथकांना दिलेला मार्ग/चौकात २० मिनिटांवर वादन करता येणार नाही 
मानाच्या मंडळांसमवेत तीन, तर अन्य मंडळांना दोन पथकांचा समावेश करता येईल
मिरवणुकीच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत पथकांमध्ये बदल करू नये
पथकांमुळे मिरवणूक थांबविता येणार नाही
वादनासाठी पोलिसांची परवानगी आवश्‍यक 
वाद्ये समवेत घेऊन उलट दिशेने जाता येणार नाही

ढोल-ताशा पथकांची वैशिष्ट्ये 
शहर व जिल्ह्यातील पथके     ः    २००
वादक तरुणांची संख्या     ः    १० हजार 
वादक तरुणींची संख्या     ः    ५ हजार
एकूण तरुणांची संख्या     ः    १५ हजार 

गणेशोत्सव जोशात साजरा करा; पण न्यायालयाचे आदेश पाळूनच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांबरोबर वेगवेगळ्या कारणांमुळे पोलिसांचे होणारे वाद टाळण्यासाठी ढोल-ताशा पथकांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे, अशी सूचना पुणे पोलिसांनी ढोल-ताशा पथकांना दिली आहे. त्यास ढोल-ताशा पथकांनी प्रतिसाद देत पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा पथकांचे वादन पुणेकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. मात्र पथकांमधील काही अतिउत्साही तरुणांकडून भाविकांशी अरेरावी केली जाते. त्याचा फटका मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्यांना बसतो. त्याचबरोबर ढोल-ताशा पथके पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत मानाच्या व मुख्य गणेशोत्सव मंडळांसमोर तासन्‌तास वादन करणे, एकाच ठिकाणी भरपूर वेळ घालविणे यांसारखे प्रकार करतात. 

परिणामी मिरवणुकीस संथगती प्राप्त होते. त्यावरून पोलिस व ढोल-ताशा पथकांमध्ये वादाचे प्रसंग घडतात. हा प्रकार टाळण्यासाठी ढोल-ताशा पथके, गणेशोत्सव मंडळांना उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे, असे आवाहन सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. त्याबाबतचा आदेश त्यांनी गुरुवारी दिला.

न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी दिलेल्या नियमावलीचे 
ढोल-ताशा पथकांकडून निश्‍चित पालन केले जाईल. पथके शिस्तबद्ध वादन करून विसर्जन मिरवणूक गाजवतील.
- पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र

loading image
go to top