ढोल-ताशांवर ‘शिवस्तुती’, ‘तांडव’, ‘लावणी’बरोबरच यंदा ‘बाहुबली’ बीटस्‌ची क्रेझ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 August 2019

 येथील विविध ढोल-ताशा पथकांना केवळ कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातूनही गणेशोत्सवात मोठी मागणी आहे. यंदाच्या महापुराच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने उत्सव साजरा होणार असला तरी बहुतांश पथकांतील तरुण आपापल्या मंडळाचा गणपती ढोल-ताशांच्या निनादात आणणार आहेत.

कोल्हापूर - येथील विविध ढोल-ताशा पथकांना केवळ कोल्हापूरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातूनही गणेशोत्सवात मोठी मागणी आहे. यंदाच्या महापुराच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने उत्सव साजरा होणार असला तरी बहुतांश पथकांतील तरुण आपापल्या मंडळाचा गणपती ढोल-ताशांच्या निनादात आणणार आहेत.

‘शिवस्तुती’, ‘तांडव’, ‘लावणी’बरोबरच यंदा ‘बाहुबली’ बीटस्‌ची क्रेझ असेल. दरम्यान, शहरात १५ हून अधिक पथके असून, जिल्ह्यातील संख्या २५ आहे. या माध्यमातून सुमारे पाच हजारांहून अधिक तरुणाई उत्सवासाठी सज्ज झाली आहे.
लोकनृत्याचाही समावेश

ढोल-ताशा पथकात ढोलाला साथ असते, ती ताशा व झांजांची. या सर्वांचा समन्वय साधून विविध रचना सादर होत असतात. दरवर्षी एखाद्या नव्या रचनेची त्यात भरच पडत असते. अतिशय जोशपूर्ण व वीररसाने भारलेले वादन हे ढोल-ताशा पथकांचे वैशिष्ट्य. बीभत्स नृत्याला पर्याय म्हणून पुढे आलेली बर्ची नृत्याची संकल्पनाही आता येथे रुजली आहे. अतिशय गतिशील असा हा नृत्य प्रकार साऱ्यांनाच भारावून टाकतो. केरळ नृत्यासह विविध लोकनृत्यांचाही सादरीकरणात समावेश झाला आहे. 

रोज सायंकाळी सराव 
पाच वर्षांत शहर आणि जिल्ह्यात ढोल-ताशा पथकांची संकल्पना चांगलीच रुजली आहे. डॉल्बीला विरोध तर आहेच; त्याशिवाय शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ढोल-ताशा पथकांकडे तरुणाई मोठ्या संख्येने आकर्षित होऊ लागली आहे. शहरातील शाहू गर्जना, करवीर नाद, करवीर गर्जना, श्रीमंत जिजाऊ, जय महाराष्ट्र, स्वराज्य, तालब्रह्म, महालक्ष्मी प्रतिष्ठान, 

एकदंत, आम्ही कोल्हापूरकर, जगदंब, सिद्धेश्‍वर, तालनाद, रणांगण आदी पथकांना मोठी मागणी आहे. या पथकांचा रोज सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत सराव रंगला आहे.    

यंदा सर्वच ढोल-ताशा पथकांना बाहेरून मोठी मागणी आहे. मुंबईतूनही मागणी असली, तरी वाहतूक खर्चामुळे नकार द्यावा लागतो. यंदाच्या गणेशोत्सवासाठी म्हणून आम्ही खास ‘बाहुबली’ बीटस्‌ घेऊन येणार आहे.  
- उदय पोतदार,
शिवगर्जना पथक

आमच्या पथकात फक्त मुली आणि महिलाच आहेत; मात्र म्हणून आम्ही सादरीकरणात कुठेच कमी पडत नाही. यंदाच्या उत्सवासाठी आम्हीही नवीन काही ‘बीटस्‌’ तयार करत आहोत.
- साक्षी पन्हाळकर,
जिजाऊ पथक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Dhol Tasha squad have Bahubali, Tandav craze