पाकिस्तानमध्ये युद्धाची चर्चा

यूएनआय
शनिवार, 24 सप्टेंबर 2016


आकाशातील आपले संरक्षक नेहमीच सज्ज असतात. आपल्या गाड्यांचे रस्ते आपल्या धावपट्ट्या आहेत.
- ख्वाजा असिफ, पाकचे संरक्षणमंत्री

माध्यमे नियमित सरावाचा बाऊ करत आहेत. तरीही पाकिस्तान आणि लष्करी दले देशाच्या सार्वभौमत्वाचा कोणत्याही परिस्थितीत बचाव करण्यासाठी सज्ज आहेत.
- नफीस झकारिया, पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते

इस्लामाबादमध्ये एफ-16 लढाऊ विमानांच्या घिरट्या
इस्लामाबाद - पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उत्तर काश्‍मीरमधील उरी येथील ब्रिगेड स्तरावरील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले आहेत. भारताला युद्धाची खुमखुमी असल्याच्या चर्चेने पाकिस्तानमध्ये जोर पकडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री येथे एफ-16 जातीची लढाऊ विमाने आकाशात घिरट्या घालत असल्याचे पाहायला मिळाले.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारत युद्धाच्या तोफा उडवत असून, राजकारणी आणि लष्करी अधिकारीही याबाबतचे चित्र रंगवत आहेत. त्याला माध्यमांचीही साथ मिळत आहे. कराचीतील एक्‍स्प्रेस ट्रिब्यूनने म्हटले आहे, की उरी हल्ल्यानंतर भारत बंदुकीची भाषा बोलत असून, या हल्ल्यासाठी पाकिस्तानवर दोषारोप करत आहे. त्याशिवाय वेगवेगळी निवेदने काढण्यास सुरवात केली आहे.
 

त्याही पुढे जाऊन भारतीय लष्कराने जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेसह 778 किलोमीटर परिसरातील हालचाली वेगाने वाढविल्या आहेत. भारतीय लष्करी अधिकाऱ्याने बीबीसी उर्दूला दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची सुरक्षा लक्ष्य करण्याच्या उद्देशाने भारताने सीमारेषेवर बोफोर्ससारख्या मोठ्या क्षमतेच्या तोफा तैनात करण्यास सुरवात केली असल्याचे पाकमधील माध्यमांच्या वृत्तांत म्हटले आहे. भारतीय लष्कराने मात्र ही सर्व तयारी युद्धासाठी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 

उरीतील हल्ल्याला भारत नक्कीच उत्तर देईल. फक्त ठिकाण आणि वेळ आम्ही ठरवू, असे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच म्हटले असल्याने पाकमध्ये युद्धाची चर्चा जोर पकडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री इस्लामाबादमध्ये एफ-16 जातीची लढाऊ विमाने आकाशात घिरट्या घालत असल्याचे पाहायला मिळाले. एका पाकिस्तानी पत्रकारानेच याबद्दल ट्‌विट प्रसिद्ध केल्यानंतर त्यावरून चर्चा सुरू झाली.
 

पाकिस्तानातील जिओ टीव्हीचे पत्रकार हामीद मीर यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून ही माहिती प्रसिद्ध केली. त्यांच्या ट्‌विटनंतर अनेक लोकांनी शंका तसेच प्रश्न विचारण्यास सुरवात केली. त्यामुळेही त्यांनी लगेचच दुसरे ट्‌विट करून, लोकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही; आपले सैन्य कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास तयार आहे, असे सांगितले.

त्यांच्या या ट्‌विटमुळेच पाकिस्तानात गुरुवारी रात्री हवाई दलाकडून सराव करण्यात आल्याचे स्पष्ट होते आहे. या संदर्भात पाकिस्तान सरकारने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
 

Web Title: Pakistan to discuss war