हेरगिरीसाठी "पिझ्झा', "बर्गर' अशा शब्दांचा वापर

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

हकालपट्टी करण्याआधी अख्तरची चौकशी करण्यात आली होती. याबाबत तयार केलेल्या एका अहवालानुसार, "पिझ्झा खात आहे' याचा अर्थ अन्सल प्लाझा ऍम्फिथिएटर येथे ठरलेल्या वेळेत भेटणे आणि "बर्गर खात आहे' याचा अर्थ दिल्लीतील पितमपुरा मॉलमध्ये भेटणे, असा होतो. या सांकेतिक भाषेचा वापर करत पाकिस्तानच्या "आयएसआय'साठी काम करणाऱ्या गुप्तचरांनी सार्वजनिक गर्दीच्या जागांमध्ये महत्त्वाची कागदपत्रांची देवाणघेवाण केली

नवी दिल्ली - भारतात हेरगिरी केल्याबद्दल अटक झालेल्या चौघा जणांनी कटकारस्थान आखताना आणि त्याची अंमलबजावणी करताना "पिझ्झा', "बर्गर' अशा शब्दांचा वापर केल्याचे भारतातून हकालपट्टी केलेल्या महमूद अख्तरच्या चौकशीतून उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

हकालपट्टी करण्याआधी अख्तरची चौकशी करण्यात आली होती. याबाबत तयार केलेल्या एका अहवालानुसार, "पिझ्झा खात आहे' याचा अर्थ अन्सल प्लाझा ऍम्फिथिएटर येथे ठरलेल्या वेळेत भेटणे आणि "बर्गर खात आहे' याचा अर्थ दिल्लीतील पितमपुरा मॉलमध्ये भेटणे, असा होतो. या सांकेतिक भाषेचा वापर करत पाकिस्तानच्या "आयएसआय'साठी काम करणाऱ्या गुप्तचरांनी सार्वजनिक गर्दीच्या जागांमध्ये महत्त्वाची कागदपत्रांची देवाणघेवाण केली. मेट्रो स्थानकांसारख्या ठिकाणी सरकारी कार्यालयांतून चोरी केलेली कागदपत्रे पायऱ्यांवर ठेवली जात होती आणि दुसरी व्यक्ती तेथून ती कागदपत्रे घेऊन जात होती. अख्तर आणि त्याचा सहकारी शोएब यांनी पेनड्राइव्हच्या साह्यानेही सरकारी कार्यालयांतील संगणकातून माहिती चोरली आहेत.

समाजवादी पक्षाचे खासदार मुनव्वर सलीम यांचा नुकताच अटक झालेला स्वीय सचिव फरहात खान हा सलग वीस वर्षे पकडला न जाता भारतात हेरगिरीचे काम करत होता. दिवंगत खासदार मुनव्वर हसन यांच्यासाठी काम करत असताना अनेक कागदपत्रे चोरल्याचे फरहातने कबूल केले आहे. फरहातने 1996 पासून चार खासदारांकडे काम केले आहे. संसदेशी निगडित कागदपत्रे, समितीचे अहवाल आणि खासदारांकडून इतर माहिती चोरणे आणि "आयएसआय'ला पुरविणे हे त्याचे मुख्य काम असे. त्याला दहा हजार ते एक लाख रुपयांचा मोबदला मिळत असे. तो अख्तरच्या सातत्याने संपर्कात असे. त्याने अख्तरच्या आधीचे अधिकारी शमशाद आणि फय्याज यांच्याबरोबरही काम केले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) काहींनी फरहातला माहिती पुरविली आहे काय, याबाबतही पोलिस तपास करत आहेत.

गुप्तचरांची निवड पद्धत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब आणि त्याचे सहकारी हे पैशांचा मोबदला देऊन पाकिस्तानसाठी काम करू इच्छिणाऱ्यांची नावे पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या महमूद अख्तरकडे देते होते. शोएब या इच्छुकांच्या घरी जाऊन चौकशी करत असे. त्यांच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत असेल, तर त्याचे नाव वेगळ्या यादीत टाकले जाई. निवड केलेल्या नव्या गुप्तचरांना त्यांची ओळख लपवून ठेवण्याचे प्रशिक्षण दिले जाई.

Web Title: pizza,burger were the code words