तुम्हाला‌ माहितीय का? डिप्रेशनमधील जगातली प्रत्येक सहावी व्यक्ती भारतीय...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

जगातील नैराश्‍यग्रस्त लोकांपैकी प्रत्येक 6 वी व्यक्ती भारतातील असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली: भारत जगातील सर्वांत जास्त नैराश्‍यग्रस्त देश असल्याची माहिती जागतिक आरोग्य संस्थेच्या एका अहवालात प्रसिद्ध झाली आहे.

जगातील नैराश्‍यग्रस्त लोकांपैकी प्रत्येक 6 वी व्यक्ती भारतातील असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारतात मानसिक आरोग्याविषयी अनेक गैरसमज आहेत. ते आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे त्याबद्दल जास्त बोलत नाहीत आणि त्याचा चुकीचा अर्थ लावतात. याबद्दल न बोलण्यामुळे लोकांच्या मानसिक आजारात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. या अहवालानुसार भारतातील 4.5 टक्के जनता नैराश्‍याची बळी पडल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ही संख्या इतकी जास्त झाली आहे, की जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक लोक हे नैराश्‍यात आहेत. भारतानंतर चीन आणि अमेरिकेतील नागरिकांच्या नैराश्‍येचे प्रमाण सर्वाधिक आहे.

दरम्यान, भारतात सर्वाधिक समस्या या ऍनेक्‍सिटी, बायपोलार डिसॉर्डर यांसारख्या आजारांच्या आहेत. तसेच या आजारांची वाढ होण्याचे मुख्य कारण हे भारतातील मानसोपचारतज्ज्ञांची कमतरता हे आहे. 2014 मधील एका अहवालानुसार प्रत्येक एक लाख नागरिकांमागे केवळ एक मानसोपचारतज्ज्ञ असून संपूर्ण भारतात केवळ 5000 मानसोपचारतज्ज्ञ असल्याचे समोर आले होते. तसेत 2015-16 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्व्हेनुसार प्रत्येक सहाव्या भारतीयाला मानसिक उपचारांची गरज आहे; मात्र मानसोपचारतज्ज्ञांच्या अवाढव्य शुल्कामुळे सामान्य नागरिक हे उपचार घेत नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सरकारने मानसिक आजाराचे उपचार माफक शुल्कात उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकालाही मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेणे सोईस्कर होईल.

यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती तसेच चर्चा होणे गरजेचे आहे. नाही तर नैराश्‍याने ग्रासलेले रुग्ण सामाजिक बंधनांमुळे योग्य उपचारापासून दूर राहू शकतात. त्यामुळे याविषयी चर्चा करण्याची गरज असून, त्यातून भारतात वाढलेल्या नैराश्‍याच्या संकटाला आपण दूर करू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India number six is the most depressed country in the world