‘कोरोना’चा उद्रेक अद्याप कायम; मृतांची संख्या १३०० वर

पीटीआय
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

जपानमध्ये कोरोनाचा पहिला बळी
टोकिओ - जपानमध्ये आज कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला. मृत महिला जपानची असून, तिचे वय ८० होते. गेल्या शनिवारी वुहान येथे राहणाऱ्या जपानी नागरिकाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

कोलकाता विमानतळावर दोन संशयित आढळले
कोलकाता/नवी दिल्ली - कोलकाता विमानतळावर बँकॉंकहून आलेल्या दोन प्रवाशांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत तीन प्रवाशांना बाधा झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे दोन विमान कंपन्यांनी कोलकाताहून चीनला जाणारी थेट विमानसेवा रद्द केली आहे. 

बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बाधा
नवी दिल्ली - बँकॉकहून दिल्लीला आलेल्या एका प्रवाशात कोरोना व्हायरसची लक्षणं आढळून आल्याने त्याला वेगळे ठेवण्यात आल्याचे विमानतळ आरोग्य संघटनेने म्हटले आहे. १३ फेब्रुवारी रोजी स्पाइसजेटच्या बँकॉक दिल्ली विमानाने संशयित प्रवासी दाखल झाला. दिल्लीला उतरल्यानंतर त्याची चाचणी केली असता त्यात लक्षणे आढळून आली. भारतात आतापर्यंत तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे.

बीजिंग/टोकिओ - चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे थैमान सुरूच असून, बुधवारी चोवीस तासांत सुमारे २५४ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे चीनमधील मृतांची संख्या १३०० वर पोचली आहे. दरम्यान, बार्सिलोना येथे होणारी मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस कोरोनाच्या उद्रेकामुळे रद्द करण्यात आली आहे. ही परिषद २४ ते २७ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या हुबेई प्रांतात काल एकाच दिवशी २४२ जणांचा मृत्यू झाला. तसेच, १५ हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. स्थानिक आरोग्य आयोगाच्या माहितीनुसार, हुबेई प्रांतात कोरोनाचे १४,८४० नवीन रुग्ण निष्पन्न झाले आहेत. आत्तापर्यंत ४८ हजार २०६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्याचा वेगाने होणारा प्रसार पाहता ती संख्या ६० हजारपर्यंत पोचू शकते, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

मेट्रोत कोरोना-कोरोना म्हणून ओरडला अन्... 

चीनमध्ये बुधवारपर्यंत कोरोना संसर्गामुळे एकूण मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १११५ वर पोचली होती. जागतिक आरोग्य संघटनेची विशेष टीम दोन दिवसांपूर्वी चीनमध्ये पोचली आहे. चीनबाहेर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, ती ४४० वर पोचली आहे. त्यात एकाचा फिलिपिन्स येथे मृत्यू झाला आहे. याशिवाय जपानमध्ये सर्वाधिक रुग्ण दोनशेहून अधिक आढळून आले आहेत.

'या' उद्योगपतीनं अंबानींनाही मागं टाकलं; घरासाठी उधळले तब्बल...

‘डायमंड प्रिन्सेस’ला बाधा
जपानच्या समुद्रात असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या चोवीस तासांत नव्याने ४४ रुग्ण आढळले असून, ही संख्या २१८ वर पोचली. जहाजावरील कर्मचारी नोकरी गमावण्याच्या भीतीपोटी बोलावयास तयार नाहीत. मात्र, दोन भारतीय कर्मचाऱ्यांनी आपले मौनव्रत सोडले आणि व्हिडिओच्या माध्यमातून जहाजातील विदारक सत्य मांडले. त्यांनी म्हटले की, दिवसेंदिवस जहाजावर गंभीर स्थिती होत असल्याचे २४ वर्षीय जहाजावरील सुरक्षा अधिकारी सोनाली ठक्कर हिने सांगितले. आमच्या सर्वांच्या चाचण्या झाल्या असून, ज्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना बाजूला ठेवले आहे. जहाजावरील कर्मचारी डोअर टू डोअर जेवण पुरवण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे काहींना बाधा होण्याची भीती वाटत आहे. दरम्यान, जपानचे आरोग्यमंत्री कत्सुनोबू कातो यांनी आज ४४ नवीन रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली. यात डायमंड प्रिन्सेस जहाजावरील रुग्णांचा समावेश आहे, असे जपान सरकारने सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1300 death in china by corona virus