मशिदीतील एसीचा स्फोट, एका बालकासह 17 ठार तर 20 जखमी

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 September 2020

या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असून चौकशीत निष्काळजीपणाचे काही पुरावे सापडल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती नारायणगंजचे पोलिस अधीक्षक मोहम्मद झायेदुल आलम यांनी दिली.

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाकाच्या (Dhaka) हद्दीतील मशिदीत गॅस गळतीमुळे एकाच वेळी सहा एअर कंडिशनर्समध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात एका बालकासह 17 जण ठार तर 20  जण जखमी झाले आहेत.  स्थानिक अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.  शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास नारायणगंज मध्य जिल्ह्यातील (Narayanganj) बेतुल सलात मशिदीत नमाजच्या वेळेस हा स्फोट झाला.

चीनबाबत अमेरिकेचे धोरण अपयशी - रॉबर्ट ओब्रायन

'ढाका ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, शेख हसीना नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बर्न अँड प्लास्टिक सर्जरी रुग्णालयात सात वर्षांच्या मुलासह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या रुग्णालयात सध्या सुमारे 20 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असून चौकशीत निष्काळजीपणाचे काही पुरावे सापडल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती नारायणगंजचे पोलिस अधीक्षक मोहम्मद झायेदुल आलम यांनी दिली. तसेच बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि पीडितांसाठी सर्व शक्य वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सूचनाही दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नियमितपणे तपासणी होत नसल्यामुळे बांगलादेशात खराब गॅस पाइपलाइनच्या स्फोट होऊन बर्‍याचदा मृत्यू होतात. जुलै आणि ऑगस्टमध्ये गॅस सिलिंडर्ससह दोन वेगवेगळ्या अपघातात किमान दोन लोकांचा मृत्यू झाला होता. एवढेच नाहीतर गेल्या काही दिवसांपुर्वी ढाकामध्ये फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन सात मुलांचा मृत्यू झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 killed 20 injured as six air conditioners explode in bangladesh mosque