अमेरिकेवरील हल्ल्याचा फटका बाळांना...

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

. या हल्ल्यामुळे धूलिकण प्रदूषित झाले. या प्रदूषणाचा परिणाम म्हणजे अमेरिकेत अकाली प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. पूर्ण दिवस भरायच्या आतच बाळांचा जन्म होत असून, अशी बाळे कमी वजनाची असल्याचे दिसून आले आहे

 

न्यूयॉर्क - अमेरिकेच्या प्रतिष्ठित वर्ल्ड ट्रेड टॉवरवर झालेल्या "9/11'च्या दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे उलटून गेली तरी त्याच्या जखमा येथील नागरिकांच्या मनात कायम आहेत. तेथील नव्या पिढीतही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. या हल्ल्यामुळे धूलिकण प्रदूषित झाले. या प्रदूषणाचा परिणाम म्हणजे अमेरिकेत अकाली प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. पूर्ण दिवस भरायच्या आतच बाळांचा जन्म होत असून, अशी बाळे कमी वजनाची असल्याचे दिसून आले आहे

स्वित्झर्लंडमधील झुरिच विद्यापीठ व अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील संशोधकांनी 1994 ते 2004 या कालावधीतील न्यूयॉर्कमधील जन्मदराचा अभ्यास केला असून, मनुष्यबळ विकास विभागाच्या अहवालात अभ्यासातील निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. भारतात दिल्लीसारख्या दूषित हवेच्या शहरातही असे परिणाम जाणवू शकतात, असा इशाराही दिला आहे. 12 लाख प्रसूतींचा अभ्यास केल्यानंतर न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन भागात राहणाऱ्या महिलांवर या धुळीच्या प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या काळात कमी वजनाच्या बाळांच्या जन्माचे प्रमाण वाढले होते. याचा दुष्परिणाम म्हणजे पुढील आयुष्यात त्यांना मधुमेह, हृदयरोग व उच्च रक्तदाब अशा व्याधींची लागण होण्याचा धोका संभवतो, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. हवेच्या प्रदूषणाचा थेट संबंध गर्भाशी आल्यास त्याचा विपरित परिणाम नव्याने जन्माला येणाऱ्या बाळांना जन्मभर सोसावा लागतो, असे "नॅशनल जिओग्राफिक'च्या अहवालात म्हटले आहे.

दिल्ली, बीजिंगला धोक्‍याचा इशारा
गर्भधारणेच्या वेळच्या परिस्थितीचा परिणाम दीर्घकाळातील मानवी विकास व आर्थिक प्रगतीवर होतो, असे मत झुरिच विद्यापीठातील संशोधक हेन्स श्‍वान्ट यांनी व्यक्त केले आहे. जगातील ज्या देशांमध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे तेथील अर्भकांवर दुष्परिणाम आढळून येतात. दिल्ली, मेक्‍सिको सिटी, बीजिंग या शहरांचा यात समावेश होतो, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

Web Title: 9/11 impact on children