जगातील सर्वांत लठ्ठ इमान अहमदचे निधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

अबुधाबी: जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अब्दुल अत्ती ऊर्फ इमान अहमद (वय 37) हिचे सोमवारी निधन झाले. अबुधाबी येथे वजन घटविण्यासाठी ती उपचार घेत होती. इमान इजिप्तची रहिवासी आहे.

अबुधाबी: जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अब्दुल अत्ती ऊर्फ इमान अहमद (वय 37) हिचे सोमवारी निधन झाले. अबुधाबी येथे वजन घटविण्यासाठी ती उपचार घेत होती. इमान इजिप्तची रहिवासी आहे.

इमानचे वय आधी 500 किलो होते. वजनामुळे तिला हालचाल करता येत नव्हते. अति लठ्ठपणामुळे 20 वर्षे तिने घरातून बाहेर पाऊल ठेवलेले नव्हते. गेल्या वर्षी अर्धांगवायूच्या झटक्‍याने तिच्या शरीराची डावी बाजू लुळी झाली होती. वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी इमान फेब्रुवारी महिन्यात भारतात आली होती. मुंबईतील सैफी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिचे वजन 323 किलोपर्यंत घटले होते. आहारावरील नियंत्रणामुळे तिच्या पोटाचा घेरही कमी झाला होता. मात्र, अनुवांशिक चाचणीतून इमानमध्ये जनुकीय विकार असल्याचे आढळून आले. त्यामुळे शस्त्रक्रियेने ती बरी होऊ शकणार नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला.

त्यानंतर तिची बहीण शायमाने "भारतात इमानला योग्य उपचार दिले गेले नाहीत. तसेच तिच्या तब्येतीविषयी आणि वजन कमी होण्याबाबत चुकीचे दावे केल्याचा आरोप सोशल मीडियावर केला होता. शायमाने तिला पुढील उपचारासाठी 4 मे रोजी अबुधाबीतील बुर्जील रुग्णालयात हलविले होते. तेथेच इमानचे आज निधन झाले. इमानची मूत्रपिंडे निकामी झाली होती. तसेच तिला हृदयाशी संबंधित आजारही होते, असे डॉक्‍टरांनी सांगितले. बुर्जील रुग्णालयात 20 डॉक्‍टरांचे पथक तिच्यावर उपचार करीत होते. तिच्या प्रकृतीच्या चढउताराकडे ते लक्ष देत होते.

इमानचा 37 वा वाढदिवस कुटुंबीय व मित्रपरिवारासह 9 सप्टेंबरला रुग्णालयात साजरा करण्यात आला होता.

अशी होती इमान
इमान ही इजिप्तमधील अलेक्‍झांड्रिया येथील रहिवासी होती. जन्मतःच तिचे वजन जास्त होते व ते पुढे सतत वाढतच राहिले. लठ्ठपणामुळे तरुण वयात तिला चालण्यासाठीही मोठे कष्ट घ्यावे लागत असत. यामुळे ती कधीही शाळेत जाऊ शकली नाही. शरीरात पाणी जास्त प्रमाणात साठण्याच्या आजारामुळे इमानचे वजन वाढत असल्याचे डॉक्‍टरांचे म्हणणे होते. लठ्ठपणाबरोबरच तिला अनेक आजारही झाले होते. त्यामुळे ती 20वर्षे घराच्या बाहेरही पडू शकली नव्हती. मधुमेह, मूत्रपिंड विकार, उच्च रक्तदाब, थायरॉइड, स्थूलता, फुफ्फुसांतील विकार आदी विकारांनी ती ग्रस्त होती. बिछान्यावर सतत झोपून असल्याने तिचे स्नायू कमकुवत झाले होते. भारतात येण्यापूर्वी तिला निद्रानाशही होता. त्यामुळे ती फक्त एकच तास झोपत होती.

Web Title: abu dhabi news iman ahmad passes away