esakal | ‘त्यांनी’ मुलांना केवळ जन्म द्यावा, महिलांबाबत तालिबानचा सूर
sakal

बोलून बातमी शोधा

afganistan

‘त्यांनी’ मुलांना केवळ जन्म द्यावा, महिलांबाबत तालिबानचा सूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल : ‘‘महिला मंत्री बनू शकत नाहीत. त्यांनी मुले जन्माला घालावीत,’असे बोल आहेत तालिबानचा (Taliban) प्रवक्ता सईद झकरुल्ला हाश्‍मी याचे. अफगाणिस्तानमध्ये ( Afghanistan) १९९० मध्ये पहिल्यांदा या दहशतवादी संघटनेने देशाचा ताबा मिळविला होता. तालिबानचे त्यावेळचे कट्टरतावादी रूप सौम्य झाले असेल, हा समज हाश्‍मीच्या या वक्त्याने चुकीचा ठरला.

अफगाण महिलांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे,’ असे आवाहन तालिबानी नेत्यांनी केले होते. पण नवे सरकार जाहीर करताना त्यांनी मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश केलेला नाही, याबद्दल तेथील ‘टोलो न्यूज’या वृत्तवाहिनीशी बोलताना हाश्‍मीने पुराणमतवादी सूर आळवला. ‘‘महिला मंत्री बनू शकत नाही. त्यांना मंत्रिपद देणे म्हणजे तिला पेलणार नाही, असे ओझे तिच्या खांद्यावर लादल्यासारखे होईल. महिलांनी मंत्रिमंडळात सहभागी होणे आवश्‍यक नाही, त्यांनी मुले जन्माला घालावीत,’’ असे तो म्हणाला. महिला आंदोलक या संपूर्ण अफगाणिस्तानमधील महिलांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, असेही हाश्‍मी सांगितले.

हेही वाचा: गणेशोत्सवानंतर मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवू - मुख्यमंत्री

‘महिला हा समाजाचा अर्धा हिस्सा आहे,’ असे मुलाखतकाराने म्हटले असता, ‘आम्ही तसे मानत नाही. अर्धा हिस्सा कसा असू शकतो. ही संकल्पनाच चुकीची आहे. येथे अर्धा या संदर्भ मंत्रिमंडळातील सहभागाशी आहे, इतर काही नाही. जर तुम्ही तिचे अधिकार डावलले, तर काहीच फरक पडत नाही, असा याचा अर्थ होतो. माध्यमे, अमेरिका आणि त्यांचे अफगाणिस्तानमधील कळसूत्री सरकारचे जे विचार मांडत होते त्यात केवळ कार्यालयात वेश्‍याव्यवसायास प्रवृत्त करण्याशिवाय अन्य काही होते का?, असा प्रतिप्रश्‍न हाश्‍मीने केला.

आंदोलक महिलांना दोष

वेश्‍याव्यवसायासाठी सर्व महिलांना तुम्ही दोष देऊ शकत नाही, असे मुलाखतकाराने हटकले असता, ‘माझा रोख सर्व अफगाणी महिलांकडे नसून, रस्त्‍यावर आंदोलन करणाऱ्या चार महिलांकडे आहे. त्या अफगाणिस्तानमधील महिलांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. ज्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना जन्म दिला आणि इस्लामी रिती-रिवाजांचे शिक्षण दिले, त्यात खऱ्या अफगाणिस्तानच्या महिला आहेत,’ असा अजब तर्क हाश्‍मीने सांगितला. महिला मंत्री का बनू शकत नाही, या प्रश्‍नावर उत्तर देताना स्त्री काय शकते, ती मंत्रालयाची कामे करू शकत नाही. तिला पेलणार नाही, असे ओझे तुम्ही तिच्या खांद्यावर टाकत आहात, असे हाश्‍मी म्हणाला.

loading image
go to top