अफगाणिस्तानच्या भळभळीवर भारताची भरीव मलमपट्टी

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

मध्य आशिया ते दक्षिण आशिया, पूर्व ते पश्‍चिम आशिया अशा सगळ्यांना जोडणारा दुवा म्हणजे अफगाणिस्तान. साहजिकच त्याच्या शेजाऱ्यांनी, जगातील महासत्तांनी आपल्या राजकीय, आर्थिक स्वार्थापासून ते विचारधारांपर्यंत सर्वांसाठी या भूमीचा वापर केला. शीतयुद्धाच्या काळात तेव्हाच्या सोव्हिएत महासंघाने (आताचा रशिया) केलेल्या आक्रमणानंतर अफगाणिस्तानात कुठे शांतता नांदू लागली. नंतर मूलतत्त्ववादी तालिबानने सत्ता हस्तगत केली. तेथे पोसलेला दहशतवाद जगभर पसरला. तालिबान्यांची सत्ता गेली; पण अफगाणिस्तानात हिंसाचार आणि दहशतवाद आजही धुमसत आहे. देशाच्या भूभागाच्या एक तृतीयांश भागावर सरकारचे काही चालत नाही, तो दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे. आजही काबूल, कंदहारसह अनेक शहरे आणि सरकारच्या ताब्यातील भागात दहशतवाद थैमान घालत आहे. अशांततेची, अस्थिरतेची आणि द्वेषाची धार अधिक घातक करण्याचा प्रयत्न दहशतवादी करत असताना त्याला विकासकामांनी उत्तर देण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

- अफगाणिस्तान सरकारचा कारभार सुरळीत व्हावा, म्हणून भारताने तेथे आतापर्यंत दोन अब्ज डॉलर खर्च केला आहे. तेथील निवडणूक यंत्रणा सुधारण्यापासून ते लाखो डॉलर मोजून, तज्ज्ञ अभियंत्यांची फौज वापरून तेथील संसदेची इमारत उभी करून दिली आहे. संसद इमारत उभारणीसाठी नऊ कोटी डॉलर खर्च आला असून, त्याचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी केले आहे.
- 2014-15 मध्ये भारताचा अफगाणिस्तानशी व्यापार 684 दशलक्ष डॉलर होता, तो अजूनही वाढतो आहे. याच काळात भारताने अफगाणिस्तानला 422.56 दशलक्ष डॉलरची निर्यात केली आणि तेथून 261.91 दशलक्ष डॉलरची आयात केली. अफगाणिस्तानातून मोठी आयात करणारा भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
- अफगाणिस्तानपासून इराणच्या सीमेपर्यंत जोडणारा 218 किलोमीटरचा झारंज ते डेलाराम रस्ता भारताने बनवल्याने प्रवासी आणि मालवाहतुकीची सोय झाली आहे. पुल-ए-खुमरी ते काबूल उच्च दाबाची वीजवाहिनी, छिमताला उपकेंद्रांच्या उभारणीत योगदान दिले. 11 दूरध्वनी केंद्रांचे आधुनिकीकरण केले. काबूलसह 34 प्रांतांतील प्रमुख शहरे, त्यांच्या राजधान्या जोडण्याचे काम भारताने करून दिले आहे.

- अफगाणिस्तानचा शाश्‍वत विकास व्हावा, या हेतूने भारताने भरीव सहकार्य केले. भारतीय कंपन्यांही यात आघाडीवर आहेत. अफगाणिस्तानच्या हाजीगाक भागात लोखंडाच्या खाणींच्या विकासाचे कार्य सुरू आहे. काबूलमध्ये भारताच्या तांत्रिक आणि आर्थिक मदतीने खाण संस्थेच्या उभारणीसाठी पावले उचलली आहेत.
- अफगाणिस्तानच्या ग्रामीण विकासाला दिशा देणे, शिक्षण आणि आरोग्याच्या आघाडीवर प्रकल्प राबवून त्यातून तेथील जनतेचे राहणीमान उंचावणे, धरणांची उभारणी करणे, शेतीच्या विकासाला चालना देण्यासाठी संशोधन संस्थेची पायाभरणी याकडेही भारताने लक्ष दिले आहे. कंदहारमध्ये अफगाण राष्ट्रीय कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- अफगाणिस्तानातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी भारत सरकारचा त्यांना एक हजार बसगाड्या देण्याचा मनोदय आहे. शेती, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, कौशल्य शिक्षण अशा अनेकविध क्षेत्रांत छोटे छोटे विकास प्रकल्प भारताच्या सहकार्याने असे राबवले जात आहेत; जेणेकरून जनतेचे राहणीमान उंचावेल, हाताला रोजगार मिळेल. प्रशासकीय कामकाज सुरळीत होण्यासाठीही विविध प्रकारची प्रशिक्षणे तेथील जनतेला दिली जात आहेत. हजार अफगाण विद्यार्थ्यांना भारतीय विद्यापीठात शिक्षणाची संधी शिष्यवृत्तीअंतर्गत उपलब्ध करून दिली जात आहे.
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

Web Title: afghanistan news kabul blast india helps