Good News : तब्बल ७६ दिवसांनी वुहानने घेतला मोकळा श्‍वास!

Wuhan-City
Wuhan-City

वुहान : सध्या अवघ्या जगाने कोरोनासमोर हात टेकत लॉकडाउनचा मार्ग निवडला असताना या संसर्गाचा केंद्रबिंदू ठरलेल्या चीनमधील वुहान शहराने ७६ दिवसांनंतर मोकळा श्‍वास घेतला. चीन सरकारने या शहरांतील प्रवासांवरील निर्बंध बुधवारी (ता.८) मागे घेतले. आता शहरातील अकरा दशलक्षांपेक्षाही अधिक लोकांना घराबाहेर पडण्याआधी अधिकाऱ्यांची परवानगी घेण्याची आवश्‍यकता भासणार नाही.

दरम्यान चिनी लोकांच्या आरोग्यावर तेथील सरकारची देखील करडी नजर असून एका वैशिष्ट्यपूर्ण मोबाईल ॲपच्या माध्यमातून सरकार त्यांच्या आरोग्याची माहिती घेत आहे. या माध्यमातून संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही ना किंवा ती व्यक्ती कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेली नाही ना याची नोंद ठेवली जात आहे.

कोरोनाविरोधातील लढाईमध्ये झालेल्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी अनेक भागांमध्ये लाईट शोचे आयोजन करण्यात आले होते. उंच इमारती, पूल यांच्यावर डॉक्टर, परिचारिकांच्या प्रकाश प्रतिकृती पाहायला मिळाल्या. यांग्त्से नदीचा किनाराही उजळून निघाला होता. लोकांनी पूल, इमारतींवर एकत्र येऊन वुहान लेट्स गोची घोषणाबाजी करत चीनच्या राष्ट्रगीताचेही गायन केले. यावेळी अनेकांच्या हातांमध्ये चीनचे राष्ट्रध्वज होते.

स्थानिकांची प्रतिक्रिया

लॉकडाउनवर भाष्य करताना टोंग झेंगकून म्हणाले की, मागील सत्तर दिवसांपासून मी बाहेर पडलेलो नाही. आमच्या इमारतीत कोरोनाचा रूग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण इमारत सील करण्यात आली होती. आम्हाला जीवनावश्‍यक वस्तू देखील खरेदी करता येऊ शकत नाही. घरामध्ये थांबून मला वेड लागण्याची वेळ आली होती.

खबरदारी कायम

वुहान शहर आणि हुबेई प्रांतामध्ये लॉकडाउन कमालीचे यशस्वी ठरल्याचे आढळून आले. जगातील अन्य देशांनाही संसर्ग रोखण्यासाठी आता त्याच मार्गाचा अवलंब करायला सुरवात केली आहे. वुहानमधील लोकांनी मानसिक आणि भौतिक पातळीवर खूप कष्ट सहन केल्याचा दावा झँग जियांग यांनी स्पष्ट केले. वुहानमधील ७६ दिवसांच्या लॉकडाउनदरम्यान लोकांना केवळ जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठीच बाहेर सोडले जात होते. दरम्यान भविष्यात पुन्हा संसर्गाचा उद्रेक होऊ नये म्हणून लोकांना मास्क घालणे, वारंवार शरीरातील तापमान तपासणे तसेच सामाजिक विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे.

आताच जल्लोष नको

सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पीपल्स डेली या वर्तमानपत्राने मात्र या विजयाचा आताच उत्सव करू नका असे म्हटले आहे. हा विजय अंतिम नसल्याचे या वर्तमानपत्राच्या ताज्या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com