स्वीडननंतर आता नॉर्वेमध्येही इस्लामविरोधी दंगा; कुरानच्या प्रति फाडल्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 30 August 2020

स्वीडनमधील इस्लामविरोधी निदर्शनानंतर आता याची आग शेजारील नॉर्वे राष्ट्रामध्येही पसरली आहे.

ओस्लो- स्वीडनमधील इस्लामविरोधी निदर्शनानंतर आता याची आग शेजारील नॉर्वे राष्ट्रामध्येही पसरली आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये शनिवारी इस्लामविरोधी आणि इस्लाम समर्थक यांच्यामध्ये हिंसक निदर्शने झाली. मिळालेल्या माहितीनुसार निदर्शकांनी मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुरानच्या प्रति फाडल्या आहेत. या निर्दशनांचे आयोजन नॉर्वेच्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या 'स्टॉप इस्लामायझेशन ऑफ नॉर्वे' या संघटनेने (SIAN) केले होते. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.  

स्वीडनमध्ये मुस्लीमविरोधी गटाने कुरानला लावली आग; दंगल उसळली

आंदोलक शनिवारी नॉर्वेची राजधानी ओस्लोच्या संसदेच्या बाहेर जमा झाले होते. त्यांनी इस्लामी विचारधारेविरोधात आपला विरोध दर्शवला. हे आंदोलन जवळजवळ दोन तास चालल्याचं सांगितलं जातं.  'स्टॉप इस्लामायझेशन ऑफ नॉर्वे'चे प्रमुख नेता लार्स थोर्सन यांनी मुस्लिम विरोधी अनेक वक्तव्ये केली आहेत. त्यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याविरोधातही काही आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. यामुळे मुस्लिम समुदाय संतापला आहे. संघटनेच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. 

एका कार्यकर्त्याने कुरान काढली आणि त्याच्या प्रति फाडल्या

 'स्टॉप इस्लामायझेशन ऑफ नॉर्वे'च्या प्रदर्शनानंतर इस्लाम समर्थकही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. मात्र, पोलिसांनी तात्काळ सक्रिय होत त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांपासून दूर राहिले. याच दरम्यान  'स्टॉप इस्लामायझेशन ऑफ नॉर्वे'च्या एका सदस्याने कुरान काढली आणि त्याच्या प्रति फाडल्या. हा प्रकार उपस्थित इस्लाम समर्थकांनी पाहिला आणि विरोध प्रदर्शन आक्रमक झाले.

इस्लाम समर्थकांनी पोलिसांनी लावलेले बारकेडिंग तोडले आणि दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांशी भिडले. त्यानंतर दोन्ही गटात हाणामारी झाली. पोलिसांनी जोरदार कारवाई करत दोन्ही गटाच्या समर्थकांना पांगवले. मिळालेल्या माहितीनुसार या हाणामारीत एक व्यक्ती जखमी झाला आहे. पोलिसांनी मोठ्या संख्येने लोकांना अटक केली आहे.

याआधी स्वीडनमध्ये शुक्रवारी उजव्या विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे दंगल घडून आली. उजव्या विचाराच्या कार्यकर्त्यांनी कुरान जाळल्याने संतप्त लोकांनी आक्रमक विरोध प्रदर्शन केले होते. यावेळी अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. 

तीबेट भोवती अभेद्य भींत उभारणार; शी जिनपिंग यांचे सूतोवाच

डेन्मार्क नेत्याच्या अटकेला विरोध

देशात प्रतिबंधित असलेले डेन्मार्कच्या Hard Lineचे नेते रॅमस पालूदान  Rasmus Paludan यांना मालम येथील बैठकीसाठी परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांना स्वीडनच्या सीमेवरच अडवण्यात आले होते. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर दोनवर्षांसाठी देशात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: after swiden in Norway erupts anti Muslim riots kuran torn