हरितगृह वायू, हवा प्रदूषणामुळे वणव्यांना निमंत्रण;अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधन

pollution
pollution

लॉस एंजेलिस - जगभरातील जंगलांमध्ये वणव्यांचे प्रमाण वाढत आहे. संशोधकांनी मानवी हस्तक्षेपाचा आगीशी संबंधित घटनांवरील परिणाम तपासला. त्यावेळी, हरितगृह वायू उत्सर्जन व हवा प्रदूषणाचा जंगलातील वणव्यांवर विशिष्ट प्रादेशिक प्रभाव पडत असल्याचे त्यांना आढळले. ‘नेचर’ या प्रसिद्ध शोधपत्रिकेत यासंदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले आहे. 

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केले. त्यांनी १९२० पासून विविध मानवी वर्तनाचा हवामानांवरील परिणाम तपासला. आगीचा धोका वाढविणाऱ्या हवामानाचा वैयक्तिक परिणामही वेगळा करण्यात आला. 

यापूर्वीच्या संशोधनांतूनही मानवी वर्तन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हरित गृह वायू उत्सर्जन व हवा प्रदूषणासारख्या घटकांमुळे आगीला पूरक हवामानाचा धोका वाढत असल्याचे आढळले आहे. मात्र, त्यातील विशिष्ट घटकांचा प्रभाव अस्पष्ट होता.

संशोधक डॅनियल टॉमा म्हणाले, की जंगलामध्ये वणवा लागून तो पसरण्यासाठी योग्य हवामानाच्या स्थितीची गरज असते. त्यासाठी, गरम, कोरडे व वारे असलेले हवामान लागते. ही परिस्थिती आत्यंतिक टोकाला जाते, तेव्हा खरोखरच मोठे वणवे भडकतात. जगभरात हरितगृह वायू उत्सर्जन हा तापमानवाढीला कारणीभूत असणारा प्रमुख घटक आहे. २००५ पर्यंत या उत्सर्जनामुळे पाश्चिम आणि पूर्वोत्तर अमेरिका, भूमध्य, आग्नेय आशिया व ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात पूर्व आगीला पूरक हवामानाचा धोका २० टक्क्यांनी वाढला. मात्र, २०८० पर्यंत पश्चिम-उत्तर अमेरिका, विषुववृत्तीय आफ्रिका, नैऋत्य आशिया व ऑस्ट्रेलियात हा अतिशय गंभीर वणव्यांचा धोका ५० टक्क्यांनी वाढेल. भूमध्य, दक्षिण आफ्रिका व ॲमेझॉनच्या खोऱ्यात हा धोका दुप्पट असेल.   

मॉन्सून कमकुवत होणार
 सौर किरणांना जमिनीपर्यंत पोचण्यात एरोसोल अडथळा निर्माण करतात.  आग्नेय आशियात एरोसोलचे उत्सर्जन सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरड्या व वणव्याला पूरक हवामानात वाढ होऊ शकते. त्याचप्रमाणे, मॉन्सूनही कमकुवत होऊ शकतो.

जीवाश्म इंधन कारणीभूत
संशोधकांच्या मतानुसार, जीवाश्व इंधनाचे ज्वलन व जमीन वापरातील बदलांचा प्रादेशिक परिणाम अधिक ठळक असून त्यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनाला हातभार लागत आहे. विसाव्या शतकात ॲमेझॉन व पश्चिम उत्तर अमेरिकेत जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे आगीला पूरक अशा टोकाच्या हवामानात ३०टक्के वाढ झाल्याचे निरीक्षणही संशोधकांनी नोंदविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com