अल कायदाचा म्होरक्‍या हवाई हल्ल्यात ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 जानेवारी 2019

अल कायदाचा म्होरक्‍या जमाल अल-बदावी हा येमेन येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त "पेंटागॉन'ने दिले आहे.
 

वॉशिंग्टन- अल कायदाचा म्होरक्‍या जमाल अल-बदावी हा येमेन येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त "पेंटागॉन'ने दिले आहे.

अमेरिकेच्या नौदलाची क्षेपणास्त्रविनाशिका "यूएसएस कोल' ही 12 ऑक्‍टोबर 2000 मध्ये येमेनमधील अडेन बंदरावर इंधन भरण्यासाठी थांबवलेली असताना तिच्यावर दहशतवादी बॉंबहल्ला झाला होता. यात, अमेरिकेचे 17 खलाशी ठार झाले होते, तर 40 जण जखमी झाले होते. अल कायदाचा येमेनमधील म्होरक्‍या बदावी (वय 50) याचा हल्ल्यात सहभाग असल्याने त्याचा शोध अमेरिका घेत होती. त्याची माहिती देण्यासाठी 50 लाख डॉलरचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

अमेरिकेने मारिब गोव्हर्नेट येथे 1 जानेवारी रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात तो मारला गेल्याची माहिती अमेरिकेचे मध्यवर्ती कमांड कॅप्टन बिल अर्बन यांनी दिली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल अमेरिकी सैन्याचे अभिनंदन केले आहे. ""यूएसएस कोलवर केलेल्या भ्याड हल्ल्यात जीव गमवालेल्या वीरांना न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Al Qaeda chief killed in air attack