esakal | ‘अल कायदा’ डोके वर काढण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

al kayda

‘अल कायदा’ डोके वर काढण्याची शक्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुवेत सिटी: अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यामुळे अल कायदा ही दहशतवादी संघटना पुन्हा आपले सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करू शकते, असा अंदाज अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी व्यक्त केला आहे. आखाती देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी ऑस्टिन यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा: अफगाणबाबत व्यावहारिक दृष्टिकोन हवा

ऑस्टिन म्हणाले,‘‘तालिबानच्या हातात सत्ता गेल्याने त्यांचेच सहकारी असलेल्या अल कायदाला बळ प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. १९९६ ते २००१ या कालावधीत तालिबान सत्तेत असताना त्यांनी अल कायदासाठी रान मोकळे केले होते. अमेरिकेवरील हल्ल्यानंतर अल कायदाच्या म्होरक्यांना अटक करण्यास तालिबानने नकार दिल्याने अमेरिकेने आक्रमण करत तालिबानी सत्ता उलथवून टाकली.

मागील २० वर्षांत अमेरिकेने अल कायदाची पाळेमुळे खणून काढली असली तरी तालिबानची सत्ता पुन्हा आल्याने त्यांच्यात धुगधुगी निर्माण झाली आहे.’’ पुन्हा सामर्थ्य प्राप्त करण्याच्या तालिबानच्या प्रयत्नांना अमेरिकेचा विरोध असेल, असेही ऑस्टिन यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानी नेत्यांबरोबर करार करत अल कायदा किंवा इतर कोणत्याही दहशतवादी संघटनेला अमेरिकेविरोधात पाठबळ मिळणार नाही, याची तालिबानकडून हमी घेतली होती. मात्र, तालिबान अद्यापही अल कायदाच्या म्होरक्यांच्या जवळून संपर्कात असल्याचा अमेरिकेतील तज्ज्ञांचा दावा आहे.

अमेरिकेला धोका निर्माण करु शकणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला नेस्तनाबूत करण्याचे आमच्या लष्करात सामर्थ्य आहे. अफगाणिस्तानमधील घडामोडींवर आमची बारीक नजर असून जगात अनेक ठिकाणी आमची लढाऊ विमाने तैनात आहेत. - लॉइड ऑस्टिन, अमेरिकेचे संरक्षण मंत्री

loading image
go to top