esakal | लादेनचा साथीदार जवाहिरी जिवंतच; एका व्हिडिओद्वारे इशारे आणि चिथावणी
sakal

बोलून बातमी शोधा

लादेनचा साथीदार जवाहिरी जिवंतच; एका व्हिडिओद्वारे इशारे आणि चिथावणी

लादेनचा साथीदार जवाहिरी जिवंतच; एका व्हिडिओद्वारे इशारे आणि चिथावणी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बैरुत : अमेरिकेवरील हल्ल्याला वीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याने एक नवा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओद्वारे त्याने विविध ठिकाणच्या हल्ल्यांचे समर्थन केले आहेच, मात्र या व्हिडिओमुळे, त्याचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.

हेही वाचा: "CM नहीं PM बदलो! मुख्यमंत्री बदलण्याने मोदींचं अपयश झाकणार नाही"

मूळ इजिप्तमधील असलेला जवाहिरी हा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा साथीदार आहे. लादेनला २०११ मध्ये ठार मारल्यानंतर तो अल कायदाचा म्होरक्या बनला. त्याने शनिवारी (ता. ११) व्हिडिओ जारी केल्याचे दशतवाद्यांच्या संकेतस्थळांवर लक्ष ठेवून असणाऱ्या ‘साइट’ या गटाने सांगितले. ६१ मिनीटे आणि ३७ सेकंदांच्या या व्हिडिओमधून अल जवाहिरीने,‘ जेरुसलेम कधीही ज्यू लोकांचे होणार नाही,’ असा दावा केला. या वर्षी जानेवारी महिन्यात सीरियामध्ये रशियाच्या सैनिकांवर झालेल्या हल्ल्यासह अल कायदाने घडवून आणलेल्या हल्ल्यांचेही त्याने कौतुक केले. त्याच्या बोलण्यात अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्यमाघारीचाही उल्लेख आला. अर्थात, अमेरिकेने गेल्या वर्षीच सैन्यमाघारीचा निर्णय जाहीर केल्याने अल जवाहिरीचा हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांत चित्रीत झाला असल्याबाबत शंका असल्याचे ‘साइट’ने म्हटले आहे. अफगाणिस्तानची सूत्रे तालिबानने ताब्यात घेतल्याच्या घटनेचा उल्लेख जवाहिरीच्या व्हिडिओमध्ये नसला तरी एक जानेवारीला रशियाच्या सैन्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख असल्याने हा व्हिडिओ याच वर्षातील असल्याचे ‘साइट’ने खात्रीपूर्वक सांगितले आहे.

हेही वाचा: योगींच्या जाहिरातीत कोलकत्याचा उड्डाणपुल; तृणमूलचा आक्षेप

दीर्घ आजारपणामुळे अल जवाहिरीचा मृत्यू झाल्याची अफवा गेल्या वर्षी पसरली होती. तो जिवंत असल्याचे सिद्ध करणारा कोणताही व्हिडिओ किंवा इतर पुरावा मिळाला नव्हता. काल प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमुळे तो जिवंतच असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘त्याचा मृत्यू झाला असला तरी तो या वर्षी एक जानेवारीनंतर झाला असेल,’ असे ‘साइट’ने म्हटले आहे.

‘अल कायदा’ला स्पर्धा

गेल्या काही वर्षांत ‘अल कायदा’ला इतर दहशतवादी संघटनांशी स्पर्धा करावी लागत आहे. इराक आणि सीरियातील मोठा भूभाग २०१४ मध्ये ताब्यात घेतलेल्या ‘इसिस’चे महत्त्व वाढले आहे. त्यांनी या दोन्ही देशांत मिळून खिलाफतीचे राज्य घोषित केले होते. या देशांमधील त्यांची खिलाफत आता नष्ट झाली असली तरी त्यांचे दहशतवादी अद्यापही सक्रीय आहेत आणि हल्लेही घडवून आणत आहेत. त्यांचा म्होरक्या अबु बक्र अल बगदादीला अमेरिकेने ऑक्टोबर २०१९ मध्ये सीरियात ठार मारले होते. अल कायदाला तालिबानशीही स्पर्धा करावी लागत आहे.

loading image
go to top