पुतीन यांचे कट्टर विरोधक एलेक्सी नवाल्गी कोमातून आले बाहेर

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 7 September 2020

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक एलेक्सी नवाल्गी यांच्यावर जर्मनीत उपचार सुरु आहेत.

बर्लिन- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक एलेक्सी नवाल्गी यांच्यावर जर्मनीत उपचार सुरु आहेत. येथील रुग्णालयाने नवाल्गी कोमामधून बाहेर आले असल्याची माहिती दिली आहे. तसेच ते आता बोलूही शकत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. व्लादिमीर पुतीन यांचे टीकाकार आणि त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आणणारे नवाल्गी यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता.

नवाल्गी मागील महिन्यात विमानाने मॉस्कोकडे जात होते. यावेळी ते अचानक अस्वस्थ झाले. त्यांना तात्काळ ओम्स्कच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवाल्गी यांना २२ ऑगस्ट रोजी उपचारासाठी जर्मनीत आणण्यात आले होते. तेव्हापासून ते जर्मनीच्या एका रुग्णालयात कोमामध्ये होते. त्यांच्यावर सोवियत युनियनच्या काळातील नोव्हीचोक रासायनिक द्रव वापरल्याचा दावा जर्मनीने केला आहे. 

बर्लिनच्या चेराईट रुग्णालयाने सोमवारी माहिती दिली की नवाल्गी यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. ते आता कोमामधून बाहेर आले आहेत. त्यांनी बोलण्याचाही प्रयत्न केला. मात्र, विषाचे शरीरावर दिर्घकालीन परिणाम होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे २४ तास लक्ष ठेवून आहेत. 

गरीब देशांनाही कोरोना लस वेळेत मिळणार; ‘युनिसेफ’ने घेतली मोठी मोहीम हाती

जर्मनीने नवाल्गी यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा दावा केला होता. रासायनिक अस्त्रासाठी वापरले जाणारे नोव्हीचोक हे द्रव्य देऊन नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा नि-संदिग्ध पुरावा असल्याचं जर्मनीने म्हटलं होतं. त्यानंतर नवाल्नी यांच्यावरील विषप्रयोगाची शक्यता पडताळण्यासाठी केलेल्या चाचण्यांचा तपशील पाठवावा अशी विनंती रशियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी जर्मनीकडे केली होती.  

नवाल्गी प्रकरणावरुन युरोपीय राष्ट्रांचा रशियावर दबाव

नवाल्गी यांच्यासंदर्भात ब्रिटनने दबाव आणला आहे. परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब म्हणाले की, नोव्हीचोक या घातक रसायनाचा जर्मनीने उल्लेख केला आहे. त्यावरून रशियासमोर उत्तर देण्यासाठी अत्यंत गंभीर प्रश्न आहेत. सरकारच्या एखाद्या व्यक्तीचा हात आहे की नाही, यापेक्षा आपल्या भूमीवर रासायनिक अस्त्रांचा वापर होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे बंधन रशियावर आहे.

बाल्टिक सागराच्या खालून टाकण्यात येत असलेल्या गॅसवाहिनीच्या प्रकल्पाचा फेरविचार करण्यास रशिया आम्हाला भाग पाडणार नाही, अशी मला आशा आहे. येत्या काही दिवसांत रशियाने चौकशीसंदर्भात काही योगदान दिले नाही, तर आम्हाला सहकारी देशांशी चर्चा करावी लागेल, असं जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हैको मास म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: alexei navalny is out off coma said Berlin hospital Russia Vladimir Putin