रशियावर युरोप बंदी घालणार; नवाल्नी विषबाधा प्रकरणी एकमताने निर्णय

वृत्तसंस्था
Wednesday, 14 October 2020

रासायनिक अस्त्रांचा वापर आणि प्रसार यांच्याविरोधातील निर्बंधांनुसार संशयित अधिकाऱ्यांची मालमत्ता गोठवावी तसेच त्यांना युरोपमध्ये प्रवास करण्यास बंदी घालावी, असे सांगण्यात आले.

ब्रुसेल्स - राजकीय विरोधक अॅलेक्नी नवाल्नी यांच्या विषबाधेबद्दल दोषी धरण्यात आलेले रशियन अधिकारी आणि संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला आहे. याबाबतचा तपशील मात्र अद्याप देण्यात आला नाही.

महासंघातील सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक लक्झेम्बर्गमध्ये झाली. त्यात फ्रान्स आणि जर्मनी या देशांनी भागीदार देशांना आवाहन केले. रासायनिक अस्त्रांचा वापर आणि प्रसार यांच्याविरोधातील निर्बंधांनुसार संशयित अधिकाऱ्यांची मालमत्ता गोठवावी तसेच त्यांना युरोपमध्ये प्रवास करण्यास बंदी घालावी, असे सांगण्यात आले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महासंघाचे परराष्ट्र धोरणविषयक प्रमुख जोसेप बॉरेल यांनी सांगितले की, या प्रस्तावाचा सर्व सदस्य देशांनी संपूर्णपणे स्वीकार केला. आता कार्यवाही करण्याच्यादृष्टिने तांत्रिक तरतुदी तयार केल्या जातील. अधिकाऱ्यांच्या पदाप्रमाणे कारवाई ठरेल.

रासायनिक अस्त्र प्रतिबंध संघटनेचे निर्णय पाहता याबाबतच्या ठरावांचा भंग झाल्याचे उघड आहे. त्यामुळे याचे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत.
- हैको मास, जर्मनीचे परराष्ट्र मंत्री

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही चौकशीस संपूर्ण सहकार्य करण्यास रशियाचे मन वळविणे महत्त्वाचे आहे. घातक रसायनाचा  रशियन भूमीत वापर होणे नियमबाह्य आहे.
- हावीस्तो, फिनलंडचे परराष्ट्र मंत्री

संयुक्त निवेदनात टीका
फ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त निवेदनात रशियावर टीका केली. नवाल्नी यांची प्रकृती अचानक खालावण्याबाबत वारंवार आवाहन करूनही रशियाने कोणतेही विश्वासार्ह स्पष्टीकरण दिलेले नाही. यात रशियाचा हात असणे व याची जबाबदारी रशियाचीच असणे याशिवाय नवाल्नी यांच्यावरील विषबाधेचे कोणतेही तर्कसंगत स्पष्टीकरण असू शकत नाही, असे ठामपणे सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alexei Navalny poisoning case Europe will ban Russia